Axar Patel to lead Delhi Capitals in IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स संघाने नव्या हंगामासाठी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. नवीन कर्णधार, नवीन प्रशिक्षक या बदलासह दिल्ली कॅपिटल्स पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी आतूर असेल. अक्षर हा दिल्लीचं नेतृत्व करणारा चौदावा खेळाडू असणार आहे.
२०१९ हंगामापासून अक्षर दिल्ली संघाकडून खेळतो आहे. लिलावाआधी झालेल्या रिटेन्शन प्रक्रियेत दिल्लीने १६.५ कोटी रुपये खर्चून अक्षरला रिटेन केलं होतं. त्याचवेळी अक्षर दिल्लीच्या भविष्यकालीन योजनेचा महत्त्वपूर्ण हिस्सा असेल हे स्पष्ट झालं होतं. ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करत होता. मात्र लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघाने पंतला ताफ्यात सामील केल्याने दिल्लीची धुरा कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला होता. दिल्लीकडे फाफ डू प्लेसिस आणि के.एल.राहुल हे पर्याय होते.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेला फाफ डू प्लेसिस जगभरात ट्वेन्टी२० लीग खेळतो. त्याचा अनुभव आणि नेतृत्वशैली युवा खेळाडूंसाठी उपयुक्त ठरली असती मात्र फाफ चाळिशीत आहे. याव्यतिरिक्त दुखापतींचा मुद्दा लक्षात घेऊन फाफचा पर्याय मागे पडला. राहुलने पंजाब किंग्ज तसंच लखनौ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र कर्णधारपदासाठी उत्सुक नसल्याचं राहुलने दिल्ली संघव्यवस्थापनाला सांगितलं. हे दोन अनुभवी मोहरे बाजूला झाल्यानंतर अक्षरच्या शिक्कामोर्तब झालं. यंदाच्या वर्षीच जानेवारी महिन्यात भारताच्या टी२० संघाचा उपकर्णधार म्हणून अक्षरची निवड झाली होती.
३१वर्षीय अक्षरने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत गुजरातचं नेतृत्व केलं होतं. गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत एका सामन्यात अक्षरने दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. षटकांची गती राखता न आल्याने नियमित कर्णधार ऋषभ पंतवर एका सामन्याच्या बंदीची कारवाई झाली होती. हा सामना जिंकणं दिल्लीसाठी आवश्यक होतं. मात्र बंगळुरूने त्यांना नमवलं.
अक्षरने आयपीएल स्पर्धेत दिल्लीचं प्रतिनिधित्व करताना ८२ सामने खेळले आहेत. गेल्यावर्षी त्याने २३५ धावा आणि ११ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अक्षरने गोलंदाजीच्या बरोबरीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत उत्तम कामगिरी केली होती.
पहिल्या हंगामापासून स्पर्धेचा भाग असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेल्या वर्षी दिल्लीचा संघ बादफेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. यंदा दिल्लीने सपोर्ट स्टाफमध्येही बदल केले आहेत. भारताचे माजी फलंदाज हेमांग बदानी मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. वेणूगोपाळ राव हे संचालक असणार आहेत. मॅथ्यू मॉट सहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत. याव्यतिरिक्त इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन मेन्टॉरच्या भूमिकेत दिसेल.
पाच संघांना नव्या कर्णधाराचा शोध होता. अक्षरच्या नियुक्तीसह पाचही संघांचा कर्णधार शोधमोहीम पूर्ण झाली आहे. श्रेयस अय्यर (पंजाब) तर ऋषभ पंत लखनौची धुरा सांभाळतील. बंगळुरूने रजत पाटीदारकडे कर्णधारपद सोपवलं आहे. अजिंक्य रहाणे कोलकाताचा कर्णधार असेल आणि अक्षर दिल्लीचा गड सांभाळणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार आणि सामन्यांची संख्या
वीरेंद्र सेहवाग- ५२
ऋषभ पंत-४३
श्रेयस अय्यर-४१
गौतम गंभीर-२५
झहीर खान-२३
महेला जयवर्धने-१८
डेव्हिड वॉर्नर-१६
जेपी ड्युमिनी-१६
केव्हिन पीटरसन- ११
दिनेश कार्तिक-६
जेमी होप्स-३
करुण नायर-३
रॉस टेलर- २