DC vs RR, Axar Patel Statement: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. दोन्ही संघांनी उत्तम खेळ केला. शेवटच्या षटकात मिशेल स्टार्कने गोलंदाजीमध्ये कमाल केली आणि हातून निसटलेल्या सामन्यात दिल्लीला कमबॅक करून दिलं. शेवटी सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १२ धावा करायच्या होत्या. हे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांनी दोन चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं. त्यासह स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली.
या सामन्यानंतर यशस्वी जयस्वालबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. त्यावेळी राजस्थानकडून यशस्वी जयस्वालऐवजी शिमरॉन हेटमायर आणि रियान परागची जोडी मैदानावर आली. यशस्वी जयस्वालने या सामन्यात फलंदाजी करताना शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र, तरीदेखील त्याला फलंदाजीसाठी पाठवलं गेलं नाही. हे पाहून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेललाही आश्चर्याचा धक्का बसला.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अक्षर पटेल म्हणाला, “हेटमायरला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे मला वाटलं होतं की, रियान आणि जयस्वाल फलंदाजीसाठी येतील; पण त्यांनी ज्या कोणाला पाठवलं, ते आमच्या संघासाठी फायदेशीर ठरलं.”
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने ३७ चेंडूंचा सामना करीत ५१ धावांची खेळी केली; तर नितीश राणाने २८ चेंडूंचा सामना करीत ५१ धावा चोपल्या. या दोन्ही फलंदाजांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं; तर दुसरीकडे रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर फलंदाजीत संघर्ष करताना दिसून आले. रियान परागला या डावात अवघ्या आठ धावा करता आल्या. मात्र, तरीदेखील सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सने रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरला पाठविण्याचा निर्णय घेतला. तर, यशस्वी जयस्वालला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलं. हा निर्णय कुठेतरी फसला. कारण- दोन्ही फलंदाज सुपर ओव्हरमध्येही हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पॉरेलने ४९ धावांची खेळी केली आणि के. एल. राहुलने ३८ धावा चोपल्या. दिल्ली कॅपिटल्सला २० षटकांच्या अखेरीस ५ गडी बाद १८८ धावा करता आल्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणाने शानदार अर्धशतकी खेळी केली. २० षटकांच्या अखेरीस राजस्थानलाही १८८ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटी सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सने ११ धावा केल्या. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी १२ धावा करायच्या होत्या. हे लक्ष्य दिल्लीने दोन चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले.