Ayush Mhatre Viral Interview 6 Year Old Playing Cricket : आयपीएलमधील एल क्लासिको सामना मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स या दोन मातब्बर संघांमध्ये रविवारी (२० एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ९ गडी व २६ चेंडू राखून मात केली. या सामन्यात चेन्नईने एका १७ वर्षीय खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. चेन्नईकडून मुंबईचा मराठमोळा खेळाडू आयुष म्हात्रेने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात आयुषने वादळी खेळी केली. तसेच त्याचं क्षेत्ररक्षण पाहून प्रेक्षक भारावून गेले होते.

चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी चेन्नईने आयुषला संघात घेतलं आहे. त्यानंतर त्याला त्याच्या घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडेवर खेळण्याची संधी दिली. या सामन्यात त्याने १५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि २ षटकार फटकावले. आयुषने २१३.३३ च्या धावगतीने धावा केल्या, ज्याची सीएसकेला खूप गरज होती आणि त्यांना पॉवरप्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली. तसेच या सामन्यात चेन्नईला मुंबईचा केवळ एक गडी बाद करता आला. त्यातही आयुषचं योगदान होतं. मुंबईचा सलामीवर रायन रिकल्टन याने रवींद्र जडेजाचा एक चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार लगावण्याच्या उद्देशाने फटकावला. मात्र, तिथे उभ्या आयुषने रिकल्टनचा झेल टिपला.

मुलाखतीत आयुष काय म्हणाला होता?

दरम्यान, पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या आयुष म्हात्रेची ११ वर्षे जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. क्रीडा पत्रकार मुफद्दल वोहरा यांनी ही मुलाखत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. यामध्ये आयुषने सांगितलं की तो सेंट जोसेफ शाळेत पहिली इयत्तेत शिकतोय. तो सहा वर्षांचा आहे. तसेच तो विरारला राहत असून दररोज मुंबई लोकलने प्रवास करून मुंबईच्या ओव्हल मैदानावर सराव करण्यासाठी येतो. आयुष तेव्हा दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. तेव्हाची ही मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीवेळी आयुषने सांगितलं की त्याला फलंदाज व्हायचं आहे.

आयुषचे आजोबा काय म्हणाले?

यामध्ये आयुषच्या आजोबांनी देखील मुलाखतकाराशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “माझ्या मुलीचा मुलगा म्हणजेच माझा नातू इथे प्रशिक्षण घेतोय. तो सहा वर्षे दोन महिन्यांचा आहे. तो चांगलं क्रिकेट खेळतो हे पाहून आम्हाला वाटलं त्याला चांगलं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तो भविष्यात चांगला क्रिकेटपटू होईल की नाही हे माहिती नाही. मात्र, त्याला इथवर आणणं आणि चांगलं प्रशिक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही त्याला दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये घेऊन आलेलो आहोत.