Ayush Mhatre to join CSK Replaces Ruturaj Gaikwad : चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याने तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने अधिकृतपणे ही माहिती शेअर केली असून यासोबतच उर्वरित सामन्यांमध्ये महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. कर्णधार म्हणून धोनी ऋतुराजची जागा घेणार असला तरी ऋतुराजच्या जागी कोणता नवा फलंदाज संघात येणार असा प्रश्न अनेकांना पडला होता, त्याचं उत्तर मिळालं आहे.

ऋतुराजच्या जागी सीएसके संघ व्यवस्थापन मुंबईच्या पृथ्वी शॉचा विचार करत होतं. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने काही खेळाडूंना ट्रायलसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर सीएसकेने मुंबईकर युवा फलंदाज आयुष म्हात्रेची निवड केली आहे. आयुष अद्याप संघात दाखल झालेला नाही. पुढील काही दिवसांत तो सीएसके संघात दाखल होऊ शकतो, असं वृत्त क्रिकबझने प्रसिद्ध केलं आहे.

लिलावात दुर्लक्षित राहिलेल्या खेळाडूला संधी

सीएसके संघ व्यवस्थापनाने आयुषला तातडीने संघात सहभागी होण्यास सांगितलं आहे. आयुष यंदाच्या आयपीएलच्या महालिलावात उपलब्ध होता. त्याची ३० लाख रुपये इतकी मूळ किंमत (बेस प्राइस) होती. मात्र, कोणत्याही संघाने त्याचा विचार केला नव्हता. दरम्यान, आता ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयुषला चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून आमंत्रण मिळालं आहे.

पृथ्वी शॉची संधी हुकली

मुंबईकर पृथ्वी शॉदेखील लिलावात उपलब्ध होता, मात्र कोणत्याही संघमालकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. आता सीएसकेकडून त्याला संधी मिळेल अशी त्याला अपेक्षा होती. मात्र, पृथ्वीचा अपेक्षाभंग झाला आहे.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता

सीएसके संघ व्यवस्थापनातील सूत्रांच्या हवाल्याने क्रिकबझने आयुष म्हात्रे चेन्नईच्या संघात सहभागी होऊ शकतो असं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तात म्हटलं आहे की आयुष पुढील काही दिवसांत मुंबईत चेन्नईच्या संघात दाखल होईल. रविवारी, २० एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई असा सामना खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी आयुष चेन्नईच्या संघात दाखल होऊ शकतो. कदाचित त्याला मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याच्या घरच्या मैदानावर संधी देखील मिळू शकते.

चेन्नई पुनरागमनाच्या प्रतीक्षेत

आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नई सुपरकिंग्स संघ तळाशी आहे. संघाने आतापर्यंत सहा सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. या स्पर्धेत चेन्नईचा पहिला सामना मुंबईविरोधात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर मात केली होती. मात्र, त्यानंतरच्या सलग पाच सामन्यांमध्ये चेन्नईचा संघ पराभूत झाला.

आयुष म्हात्रेची कामगिरी

आयुष म्हात्रे याने ९ प्रथम श्रेणी सामन्यांच्या १६ डावांमध्ये ५०४ धावा जमवल्या आहेत. त्यात त्याने २ शतकं व एक अर्धशतक फटकावलं आहे. १७६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. लिस्ट ए सामन्यांच्या ७ डावांत त्याने २ शतकं व एका अर्धशतकासह ४५८ धावा फटकावल्या आहेत.