Ball-Tampering Allegations On CSK: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. रविवारी चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध पार पडला. यजमान चेन्नईने हा एल क्लासिको सामना ४ विकेट्सने जिंकला. चेन्नईच्या या विजयानंतर, धोनीच्या स्टंपिंगपासून ते रचिन रवींद्रच्या स्फोटक फलंदाजीपर्यंत सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण त्याचदरम्यान आणखी एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील चाहते सीएसकेवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये चेन्नई किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज खलील अहमद दिसत आहेत. गायकवाडने खलील अहमदकडे चेंडू देताच, खलील त्याच्या खिशातून काहीतरी काढून कर्णधार ऋतुराज गायकवाडला देताना दिसतो. या पाहिल्यानंतर अनेकजन, चेन्नई सुपर किंग्सवर बॉल टॅम्परिंगचा आरोप करत आहे.
मैदानावर ऋतुराज गायकवाड आणि खलील अहमद यांच्यात काय घडले असेल याचे काही चाहत्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी म्हटले की खलील अहमदने ऋतुराज गायकवाडकडे ‘च्युइंग गम’ दिले असावे. मुंबई इंडियन्स किंवा त्यांच्या कोणत्याही खेळाडूने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. चेन्नई सुपर किंग्जने बॉल टॅम्परिंग केल्याबद्दलची चर्चा चाहत्यांच्या एका गटाकडून केवळ अंदाजावर सुरू आहे.
आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना मोठ्या उत्साहात पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मुंबईचे फलंदाज अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यांनी २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या.
त्याच्या प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग्सने १५८ धावांचा पाठलाग करताना १९.१ षटकांत ६ गडी गमावले आणि ५ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.
मुंबई संघाकडून रोहित शर्मा खाते न उघडताच बाद झाला. तर सूर्यकुमार यादवने २९ धावा व तिलक वर्माने ३१ धावा केल्या. शेवटी दीपक चहरने महत्त्वपूर्ण २८ धावा करत संघाला १५५ धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. चेन्नईकडून खलील अहमदन आणि नूर अहमदने प्रत्येकी ४ तर आर अश्विन आणि नॅथन एलिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक ६५ धावा, ऋतुराज गायकवाडने ५३ धावा आणि रवींद्र जडेजाने १७ धावा केल्या. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही, मात्र तरीही संघाने विजय मिळवला. मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि सीएसकेला सहज विजय मिळवू दिला नाही. दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी १-१ विकेट घेतली आणि विघ्नेश पुथूरने सर्वाधिक ३ विकेट घेतले.