हैदराबाद सनराईजविरुद्ध सुपरओव्हरमध्ये पराभूत झालेल्या रॉयल चॅलेंजर्स संघ मंगळवारी येथे होणाऱ्या आयपीएल लढतीत पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक झाला आहे. या दोन संघांमधील पहिल्या सामन्यात हैदराबादने निसटता विजय मिळविला होता.
बंगळुरू संघाने मुंबईविरुद्ध १५६ धावांची मजल गाठली होती, मात्र हैदराबादविरुद्ध त्यांना जेमतेम १३० धावांपर्यंत पोहोचता आले होते. ख्रिस गेल व विराट कोहली यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली आहे. दिलशान तिलकरत्ने व मयांक अगरवाल यांना अपेक्षेइतकी कामगिरी करता आलेली नाही.
गोलंदाजीबाबत बंगळुरू संघास फारशा समस्या जाणवत नाही. त्यांच्या विनयकुमारने सातत्यपूर्ण यश मिळविले आहे. झहीर खान हा अनुभवी गोलंदाज दुखापतीमुळे खेळू शकला न सला तरी त्याची अनुपस्थिती त्यांना जाणवलेली नाही. जयदेव उनाडकत, मुथय्या मुरलीधरन, मुरली कार्तिक व मोझेस हेन्रीक्स यांनी आतापर्यंत गोलंदाजीत चांगले यश मिळविले आहे. उद्याच्या लढतीनंतर त्यांना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या लढतीपूर्वी येथील सामन्यातील विजय त्यांचा आत्मविश्वास उंचावणारा ठरेल. कोलकाताने पहिल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहज पराभव केला होता.
हैदराबाद संघाने लागोपाठ दोन सामने जिंकून स्पृहणीय कामगिरी केली आहे. तरीही त्यांच्यापुढेही फलंदाजीच्या समस्या आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या अनुभवी फलंदाजांनी अपेक्षेइतकी चमक दाखवलेली नाही. कर्णधार कुमार संगकारा, पार्थिव पटेल, कॅमेरून व्हाईट, थिसारा परेरा यांच्यावर त्यांची मोठी मदार आहे. प्रभावी गोलंदाजी हेच हैदराबादच्या यशाचे गमक ठरले होते. त्यांच्या डेल स्टेन या द्रुतगती गोलंदाजाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चार बळी घेतले होते. इशांत शर्मा, थिसारा परेरा, अमित मिश्रा यांनीही गोलंदाजीत आपला ठसा उमटविला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), अभिमन्यू मिथुन, अभिनव मुकुंद, अँड्रय़ू मॅकडोनाल्ड, चेतेश्वर पुजारा, ख्रिस्तोफर बर्नवेल, डॅनियल व्हेटोरी, हर्षल पटेल, के. पी. अप्पाना, मोझेस हेन्रीक्स, ख्रिस गेल, तिलकरत्ने दिलशान, मयांक अगरवाल, डॅनियल ख्रिस्तियन, करुण नायर, अरुण कार्तिक, जयदेव उनाडकत, विनयकुमार, मुथय्या मुरलीधरन, पंकजसिंग, पी. प्रशांत.
हैदराबाद सनराईज- कुमार संगकारा (कर्णधार), अक्षत रेड्डी, आशिष रेड्डी, डेल स्टेन, पार्थिव पटेल, कॅमेरून व्हाईट, हनुमान विहारी, थिसारा परेरा, डी. रवि तेजा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, नाथन मॅककुलम, अंकित शर्मा, आनंद राजन, बिपलाब समंतरॉय, डॅरेन सॅमी, करण शर्मा, प्रशांत पद्मनाभन, क्विन्टोन डीकोक, सचिन राणा, शिखर धवन, ख्रिस लिन, सुदीप त्यागी, टी. सर्गुनम, वीरप्रतापसिंग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा