* रंगतदार लढतीत बंगळुरुचा मुंबईवर २ धावांनी विजय
* नाबाद ९२ धावांची खेळी साकारणारा गेल सामनावीर
* दिनेश कार्तिकची अर्धशतकी खेळी व्यर्थ
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या रोमहर्षक सामन्यात अखेर बाजी मारली ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने. सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग बाद झाल्यावरही दिनेश कार्तिकने अर्धशतक झळकावत विजय मुंबईच्या तोंडाशी आणून दिला होता, पण अखेरच्या षटकात मात्र विनय कुमारच्या अप्रतिम गोलंदाजीने हा मुंबईचा विजयाचा घास हिरावून घेतला. अखेरच्या षटकात कार्तिकबरोबर अंबाती रायुडूलाही बाद केले. अखेरच्या चेंडूवर ४ धावा हव्या असताना विनयने अप्रतिम ‘यॉर्कर’ टाकत संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला. गेलच्या तुफानी नाबाद ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर चॅलेंजर्सने १५६ धावा उभारल्या होत्या.  गेलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१५६ धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर (२३) आणि कर्णधार रिकी पॉन्टिंग (२८) यांनी सावध, पण संयमी सुरुवात करत ५२ धावांची सलामी दिली. ही अनुभवी जोडी संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत असतानाच तेंडुलकर धावचीत, तर पॉन्टिंग यष्टीचीत झाला आणि सामन्याचे फासे पलटल्यासारखे वाटले. २४ चेंडू आणि ५१ धावा हे समीकरण मुंबईची फलंदाजी पाहता सोपे वाटत नव्हते. पण डॅनियल ख्रिस्तियानच्या १७व्या षटकांत कार्तिकने तीन षटकारांसह २४ धावांची लयलूट केली आणि अर्धशतक पूर्ण करत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. पण अखेरच्या षटकात कार्तिक बाद झाल्यावर सामना मुंबईच्या हातून निसटला.
तत्पूर्वी, ख्रिस गेलने आपल्या तुफानी झंझावाताची प्रचिती पहिल्याच सामन्यात दिली. मुबंईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी तो योग्य असल्याचे दाखवून दिले. जसप्रीत बुमराह या पदार्पण करणाऱ्या युवा गोलंदजाने रॉयलच्या फलंदाजांचा चांगलेच जखडून ठेवत त्यांची ३ बाद ३१ अशी अवस्था केली. ही सर्व अवस्था पाहून गेल डगमगला नाही, तर त्याने गोलंदाजीवर हल्ला चढवत त्यांच्या आक्रमणातली हवा काढून टाकली. गेलने ५८ चेंडूंत ११ चौकार आणि ५ खणखणीत षटकारांच्या जोरावर नाबाद ९२ धावांची खेळी साकारली, गेलच्या या तुफानी खेळीमुळेच रॉयल चॅलेंजर्सला २० षटकांत ५ बाद १५६ अशी मजल मारता आली. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीतने ३२ धावांत ३ बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : २० षटकांत ५ बाद १५६ (ख्रिस गेल ९२; जसप्रीत बुमराह ३/३२) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १५४ (दिनेश कार्तिक ६०; विनय कुमार ३/२७) सामनावीर : ख्रिस गेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा