BCB President Jalal Yunus statement about CSK : आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपला नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. ज्यामध्ये संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मोसमात सीएसके संघाचा भाग असलेला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. मुस्तफिझूर १ मे रोजी पंजाबविरुद्ध होणाऱ्या सामन्यातपर्यंतच सीएसकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. कारण बीसीबीने त्याला फक्त एका दिवसाची मुदत वाढ दिली आहे. त्याचबरोबर बीसीबीचे क्रिकेट संचालन अध्यक्ष जलाल युनूस यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांना चकित केले आहे.
मुस्तफिझूर रहमान १ मे पर्यंत सीएसकेसाठी उपलब्ध –
चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान १ मे नंतर सीएसकेसाठी उपलब्ध असणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) अंतिम मुदत निश्चित केली आहे. कारण राष्ट्रीय संघ ३ मे पासून घरच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्याची तयारी करत आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही, कारण बांगलादेशही टी-२० विश्वचषकापूर्वी अमेरिकेविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहे. ही मालिका २१ मेपासून सुरू होणार आहे. तसेच आयपीएल २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार बीसीबीचे क्रिकेट संचालन अध्यक्ष जलाल युनूस म्हणाले, “मुस्तफिझूर रहमानला आयपीएलमध्ये शिकण्यासाठी काहीही नाही. मुस्तफिझूरची शिकण्याची प्रक्रिया संपली आहे. खरं तर, आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे त्याच्याकडून शिकू शकतात. याचा बांगलादेशला कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे आम्हाला मुस्तफिझूरच्या फिटनेसची चिंता आहे.”
हेही वाचा – IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
बुधवारी पत्रकारांशी बोलताना युनूस म्हणालले की, “चेन्नई सुपर किंग्जला मुस्तफिझूर रहमानकडून फक्त१०० टक्के योगदान घ्यायचे आहे. तसेच सीएसकेला त्याच्या फिटनेसबद्दल कोणतीही डोकेदुखी नाही, पण आम्हाला आहे. आम्ही मुस्तफिझूरला परत आणण्याचे कारण केवळ झिम्बाब्वे मालिकेत खेळणे नाही. खरं तर, जर त्याला येथे आणले गेले, तर आम्ही त्याच्यावर कामाच्या भारासह योजना आखू, परंतु जर तो आयपीएलमध्ये असेल तर ही योजना आखता येणार नाहीत.”
हेही वाचा – KKR vs RR : जोस बटलरचं धोनी-कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “ते दोघे ज्या प्रकारे शेवटपर्यंत…”
मुस्तफिझूर रहमानची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –
आयपीएल २०२४ मधील मुस्तफिझूर रहमानच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये १८.३० च्या सरासरीने आणि ९.१५ च्या इकॉनॉमीने १० विकेट घेतल्या आहेत. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध २, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २ आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध १ विकेट्स घेतली.