Virat Kohli Fine: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीही आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टमुळं अडचणीत सापडला आहे. विराट कोहलीची सामन्यातील दहा टक्के शुल्क कपात करण्यात आली आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सीएसकेविरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ‘कोड ऑफ कंडक्ट’चं उल्लंघन केल्याचं उघडकीस आलं आहे. विराट कोहली आयपीएल ‘कोड ऑफ कंडक्ट’च्या आर्टिकल २.२ च्या लेव्हल १ मध्य दोषी ठरला आहे. त्यामुळे कोहलीवर दंडात्मक कारवाई केल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे.
सीएसकेविरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहली स्वस्तात माघारी परतला होता. विराट फक्त ६ धावा करून तंबूत परतला होता. सीएसकेच्या आकाश सिंगने विराटला क्लीन बोल्ड केलं होतं. विराट कोहलीने शिवम दुबे बाद झाल्यानंतर आक्रमक अंदाजात जल्लोष केला होता. या कारणास्तव मॅच रेफरीने त्याच्याविरोधात अशाप्रकारची कारवाई केली आहे. पारनेलच्या गोलंदाजीवर शिवम दुबे झेलबाद झाला होता.
IPL आर्टिकल २.२ काय आहे?
आर्टिकल २.२ सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरण किंवा कपडे, ग्राऊंड उपकरण किंवा फिटिंगच्या दुरुपयोगाविषयी आहे. याआधी याच आर्टिकलनुसार लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खानवरही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आवेशने आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय धाव काढताना हेल्टेम जमिनीवर फेकला होता.
१६ एप्रिलला रोहित शर्माच्या जागेवर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादववर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आयपीएलमध्ये त्याने पहिल्यांना कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. तसंच गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसलाही स्लो ओव्हर रेटच्या कारणास्तव १२ लाखांचा भुर्दंड लावण्यात आला होता. स्लो ओव्हर रेटशी संबंधित कोड ऑफ कंडक्टनुसार जर एखादा कर्णधार पहिल्यांदा असं करत असेल, तर त्याच्यावर १२ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात येते.