BCCI calls meeting of IPL team owners : आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू झाला असून या स्पर्धेत आतापर्यंत १३ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसी) या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व १० फ्रँचायझींच्या मालकांची बैठक बोलावली आहे. १६ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये ही बैठक होणार आहे. या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे.
बिन्नी, जय शाह आणि आयपीएल चेअरमन या बैठकीला उपस्थित राहणार –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीसाठी सर्व १० टीमच्या मालकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. संघ मालकांसह त्यांचे सीईओ आणि ऑपरेशनल टीम देखील या बैठकीला उपस्थित राहू शकतात असा अंदाज वर्तवला जात असला तरी, ही बैठक केवळ मालकांसाठी नियुक्त करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंह धुमाळ हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांनी पाठवले असल्याचे समजते.
मेगा लिलावापूर्वी धोरणांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात –
हेमांग यांनी निमंत्रणपत्रिकेत बैठकीचा अजेंडा स्पष्ट केलेला नाही, मात्र अचानक बोलावलेल्या बैठकीकडे पाहता, पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय धोरणांबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊन अनेक मुख्य चिंता दूर करू शकेल, असे दिसते. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, बैठकीत ते आयपीएलला पुढे कसे न्यायचे यावर चर्चा करतील.
हेही वाचा – KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?
बैठकीदरम्यान रिटेंशनवर लक्ष केंद्रित केले जाईल –
या बैठकीत लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा होऊ शकते, असे समजते. या संदर्भात आयपीएल संघांची वेगवेगळी मते आहेत. किती खेळाडूंना कायम ठेवायचे यावर एकमत नाही आणि बीसीसीआय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्यम मार्ग काढेल असा विश्वास आहे. काही आयपीएल फ्रँचायझी मालकांचे मत आहे की रिटेंशन संख्या वाढवायला हवा. ते असा युक्तिवाद करत आहेत की संघांनी स्वतःची स्थापना केली आहे. आता त्यांचा ब्रँड आणि चाहता वर्ग मजबूत करण्यासाठी सातत्य आवश्यक आहे. काही फ्रँचायझी असे सुचवतात की रिटेंशन संख्या आठ पर्यंत वाढवावी. मात्र, इतर वर्ग याला विरोध करत असून, रिटेंशन संख्या कमी करावी, असे सांगत आहेत.
हेही वाचा – DC vs CSK : माहीने दिल्लीविरुद्ध दमदार फटकेबाजी करत लावली विक्रमांची रांग, पाहा संपूर्ण यादी
सॅलरी कॅपबाबतही होणार चर्चा –
सॅलरी कॅप संदर्भातील आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. हा असा विषय आहे ज्यावर नेहमीच वाद होतात. बीसीसीआयनेही याबाबत ठोस भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी झालेल्या मिनी लिलावात सॅलरी कॅपची मर्यादा १०० कोटी रुपये होती, मात्र ती वाढेल असा विश्वास आहे.