आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात पंजाबने दणदणीत विजय मिळवत बंगळुरुला धूळ चारली. काल पार पडलेल्या या सामन्यात बंगळुरुने दिलेल्या २०६ धावांचे लक्ष्य पंजाबने सहजरित्या गाठले. या रोमहर्षक सामन्यामध्ये बंगळुरुच्या फाफ डू प्लेसिसने ८८ धावा केल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. मात्र श्रीलंकन संघाने ज्या खेळाडूला नाकारले त्या भानुका राजपक्षेने पंजाबकडून खेळताना गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडला. त्याने २२ चेंडूंमध्ये चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ४३ धावा करुन पंजाबला विजयापर्यंत नेले.
भानुका राजपक्षे श्रीलंकन खेळाडू असून तो आयपीएल २०२२ मध्ये पंजाबकडून खेळत आहे. मात्र श्रीलंका आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेसाठी फिटनेसचे कारण दाखवत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. या मालिकेसाठी श्रीलंकन संघाने फेब्रुवारी महिन्यात १८ खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र राजपक्षेला फिटनेसमुळे संधी दिली नव्हती. मात्र त्याच्या उत्तम खेळामुळे तसेच टी-२० सामन्यात मोठे फटके मारण्याची क्षमता असल्यामुळे त्याला पंजाबने ५० लाख रुपयांना खरेदी केले होते.
त्यानंतर आता पहिल्याच सामन्यात फिटनेसच्या कारणामुळे नाकारण्यात आलेल्या भानुका राजपक्षेने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. संघासमोर तब्बल २०६ धावांचे लक्ष्य असल्यामुळे मोठ्या खेळाची गरज असताना राजपक्षेने धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे. त्याने अवघ्या २२ चेंडूंमध्ये चार षटकार लगावले. तसेच चार षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ४३ धावांची केल्या. त्याच्या या धावांमुळे पंजाब संघ विजयापर्यंत जाऊ शकला. त्याच्या याच कामगिरीचे सध्या सगळीकडे कौतूक होत आहे.