अखेर एम. चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयाचा सूर गवसला आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला घरच्या मैदानावर खेळताना एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. यासह हा सामना ११ धावांनी आपल्या नावावर केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकअखेर २०५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २०६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने आक्रमक सुरूवात करून दिली. यशस्वी जयस्वालने ४९ धावा चोपल्या. तर वैभव १६ धावांवर तंबूत परतला. शेवटी ध्रुव जुरेलने ४७ धावांची खेळी करून राजस्थाना विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. पण जोश हेझलवूडने एकाच षटकात २ विकेट्स घेऊन राजस्थानच्या तोंडचा घास पळवला. राजस्थानचा संघ विजयापासून ११ धावा दूर राहिला.

गुणतालिकेत मुंबईला मागे सोडलं

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला मागे सोडलं आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्या स्थानी झेप घेतली होती. मात्र, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पुन्हा आपले स्थान काबिज केले आहे. गुजरात टायटन्सचा संघ १२ गुणांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. आता १२ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. १० गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्या आणि १० गुणांसह पंजाब किंग्जचा संघ पाचव्या स्थानी आहे. या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफ गाठण्याचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. ४ गुणांसह हा संघ आठव्या स्थानी आहे.

आरसीबीने उभारला २०५ धावांचा डोंगर

राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी मैदानावर आली. या जोडीने संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. फिल सॉल्टने २३ चेंडूंचा सामना करत २६ धावांची खेळी केली.

तर विराट कोहलीने ४२ चेंडूंचा सामना करत ७० धावा चोपल्या. या खेळीदरम्यान विराटने ८ चौकार आणि २ षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या देवदत्त पडिक्कलने २७ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी केली. पडिक्कल आणि विराटने मिळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारून दिली. शेवटी टीम डेव्हिड आणि जितेश शर्माने उरलेलं काम केलं. जितेश शर्माने २० धावा चोपल्या. तर टीम डेव्हिडने २३ धावा केल्या. यासह संघाची धावसंख्या २०५ धावांवर पोहोचवली.