घरच्या मैदानावर अपराजित राहिलेल्या हैदराबाद सनरायजर्स संघाला आता ‘प्ले-ऑफ’ फेरीत मजल मारण्यासाठी बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या आणि मुंबईविरुद्ध मोसमातील नीचांकी धावसंख्या नोंदवणाऱ्या चेन्नईसमोर विजय मिळवताना सनरायजर्सची अग्निपरीक्षा लागणार आहे.
सनरायजर्सचे १४ गुण झाले असून चेन्नईवर विजय मिळवल्यास ‘प्ले-ऑफ’ फेरीत मजल मारण्यासाठी सनरायजर्सची दावेदारी मजबूत होईल. दोन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नईने गुणतालिकेत अग्रस्थान काबीज केले असले तरी गेल्या सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सलग सात सामने जिंकणाऱ्या चेन्नईची घोडदौड मुंबईने रोखली. चेन्नईला ८० धावांवर रोखत मुंबईने दणदणीत विजय मिळवला. तगडय़ा आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूंसह खेळणाऱ्या चेन्नईला मुंबईने जणू इशाराच दिला. त्यांना लवकरात लवकर जोमाने पुनरागमन करावे लागणार आहे.
साखळी फेरीतच दारुण पराभव पत्करावा लागल्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीने समाधान व्यक्त केले. चुकांमधून शिकण्यासाठी आपला संघ सज्ज आहे, याचे संकेत धोनीने दिले आहेत. ‘‘आमच्यासाठी हा सावधानतेचा इशारा नक्कीच नाही. अद्याप काही साखळी सामने शिल्लक असल्यामुळे आम्ही वेळीच विजयीपथावर परतु,’’ असा विश्वास धोनीने व्यक्त केला. चेन्नईची फलंदाजी माइक हसी, सुरेश रैना आणि धोनी यांच्यावरच अधिक अवलंबून आहे. गोलंदाजीत आल्बी मॉर्केल, मोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन, ख्रिस मॉरिस आणि ड्वेन ब्राव्हो असे पर्याय चेन्नईकडे आहेत.
घरच्या मैदानावर सनरायजर्सची कामगिरी चांगली झाली आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर हैदराबादने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसारख्या बलाढय़ संघांवरही विजय मिळवले आहेत. जगातील सर्वोत्तम गोलंदाज डेल स्टेनसह इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांच्या सुरेख कामगिरीमुळे सनरायजर्सची गोलंदाजी प्रभावी ठरत आली आहे. करण शर्मामुळे सनरायजर्सची गोलंदाजी मजबूत झाली आहे. फलंदाजी ही सनरायजर्सपुढील डोकेदुखी ठरत असली तरी शिखर धवन आणि डॅरेन सॅमी फॉर्मात आल्यामुळे त्यांची काहीशी चिंता कमी झाली आहे. श्रीलंकेच्या थिसारा परेराने फलंदाजी आणि गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिले असून जी. विहारी याने चांगल्या खेळी साकारल्या आहेत. कर्णधार कुमार संगकाराची सुमार फलंदाजी सनरायजर्सपुढील चिंता वाढवत आहेत.
सामना : हैदराबाद सनरायजर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज
स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल (हैदराबाद)
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

Story img Loader