IPL 2023 सुरू होऊन भरात आलं आहे. अशात पृथ्वी शॉच्या अडचणी चांगल्या वाढल्या आहे. एकीकडे खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉ त्रस्त झाला आहे. अशात सपना गिल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला नोटीस बजावली आहे. अभिनेत्री आणि इन्फ्लुएंसर सपना गिल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर पृथ्वी शॉने पोलिसात तक्रार दाखल केली. यामुळे सपना गिलला काही काळ तुरुंगात जावं लागलं होतं. यानंतर सपना गिलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सपना गिलची कोर्टात धाव

सपना गिलने तिच्या विरोधातला गुन्हा रद्द करावा अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉसह अन्य ११ जणांना नोटीस पाठवली आहे. लवकरच पृथ्वी शॉला या प्रकरणी उत्तर द्यावं लागणार आहे. मुंबईतल्या एका पबबाहेर या दोघांमध्ये झटापट झाली होती. पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यातल्या वादाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

काय आहे पृथ्वी शॉ आणि सपना गिलचं प्रकरण?

क्रिकेटर पृथ्वी शॉ मुंबईतल्या हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी सपना गिल आणि तिच्या मित्रांचा पृथ्वीसह सेल्फी काढण्यावरून वाद झाला होता. पृथ्वी शॉने सेल्फी घेण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हल्ला करण्यात आला अशी माहिती समोर आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेलमध्ये गेला असताना झाला. तिथे सपना गिलने आणि शोबित ठाकूरने पृथ्वीकडे सेल्फीसाठी हट्ट धरला. दोघांनीही सेल्फी घेतलाह, मात्र चौथ्या सेल्फीसाठी पृथ्वीने नकार दिला. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्राने पृथ्वी शॉचा टी शर्ट धरला आणि त्याला स्वतःकडे ओढायचा प्रय़त्न केला. यामुळे पृथ्वी शॉ संतापला. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि सपना आणि तिच्या मित्रांना दूर केलं. हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोंधळ करणाऱ्या सपना गिल आणि तिच्या मित्रांना हॉटेल बाहेर काढलं होतं.

सपना आणि शोबित यांना हाकलण्यात आल्यानंतर ते दोघंही पृथ्वी शॉची वाट बघत होते. २५ मिनिटं वाट पाहिल्यानंतर पृथ्वी शॉ ची कार बाहेर पडली. कार जेव्हा बाहेर पडली त्यानंतर सपना आणि शोबितने पृथ्वी शॉचा पाठलाग केला. सुमारे १० किलोमीटर पाठलाग करण्यात आला. यानंतर पृथ्वी शॉने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सपना गिलला अटक झाली होती त्यानंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court issues notice against cricket player prithvi shaw on sapna gill plea against fir scj