Brian lara Statement On Umran Malik Form In IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादचा संघ मागील काही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील करत नाहीय. उमरानला आता संधी दिली जात नाहीय. यावरून संघ व्यवस्थापन टीकेचं धनी सुद्धा बनले आहेत. अशातच संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लाराने उमरान मलिकच्या कामगिरीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला प्रत्येक सामन्यात जिंकायचं आहे. आम्ही प्रत्येक खेळाडूचा फॉर्म पाहूनच प्लेईंग इलेव्हनचा निर्णय घेतो, असं ब्रायन लारानं म्हटलं आहे.
ब्रायन लारा माध्यमांशी बोलताना पुढं म्हणाला, उमरान मलिकसाठी आयपीएलचा हा सीजन चांगला गेला नाही. या सीजनमध्ये उमरानने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. १०.३५ च्या इकॉनोमी रेटने त्याने फक्त ५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा गोलंदाजीचा वेगही कमी झाला आहे. कदाचित याच कारणामुळं सनरायझर्स हैदराबादच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला ड्रॉप करण्यात आलं आहे.
उमरान मलिकचा फॉर्म चांगला नाही – ब्रायन लारा
गुजरात टायटन्सच्याविरोधात झालेल्या सामन्यानंतर ब्रायन लाराला उमरान मलिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना लारा म्हणाला, “तुम्हाला खेळाडूच्या फॉर्मकडेही पाहावं लागतं. उमरानकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि तो डेल स्टेनसोबत काम करत आहे. आम्हाला प्रत्येक सामना जिंकण्यासाठी खेळावा लागतो. आम्हाला फिल्डवर बेस्ट ११ खेळाडू उतरावे लागतात आणि आता इम्पॅक्ट प्लेयरच्या कारणास्तव १२ खेळाडू झाले आहेत. संघाची निवड करण्याआधी आम्ही खेळाडूचा फॉर्म बघतो.”