Bengal Cricket Association On Harsha Bhogle- Simon Doull: आयपीएल २०२५ स्पर्धेत आतापर्यंत होम ग्राऊंडवरील खेळपट्ट्यांवरून चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि ईडन गार्डन्सचे पिच क्यूरेटर सुजान मुखर्जी यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर इतर संघांनीही तक्रार केली होती. दिग्गज समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डूल यांनी, कोलकाता नाईट रायडर्सला आपले होम ग्राऊंडवरील सामने दुसर्‍या स्टेडियमवर खेळवावेत, असा सल्ला दिला होता.

हा सल्ला दिल्यानंतर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने सायमन डूल आणि हर्षा भोगले यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनाही ईडन गार्डन्समध्ये समालोचन करू देऊ नका, अशी मागणी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने केली आहे. या दोन्ही समालोचकांचं म्हणणं होतं की, पिच क्यूरेटर्स फ्रँचायजीने केलेल्या मागणीनुसार खेळपट्टी तयार करून देत नाहीत.

रेव स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने बीसीसीआयला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, या दोघांनाही ईडन गार्डन्समध्ये समालोचन करू देऊ नका, अशी मागणी केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, समालोचकांनी खेळपट्टीबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे.

हर्षा भोगले, सायमन डूल नेमकं काय म्हणाले होते?

क्रिकबझवर बोलताना सायमन डूल म्हणाले होते, ” फ्रँचायजी स्टेडियमची फिस देत आहेत. ते आयपीएलमध्ये होणारा सर्व खर्च भरून देत आहेत. तरीदेखील क्यूरेटर होम टीमचं म्हणणं ऐकून घेत नसेल, तर फ्रँचायजीचे सामने दुसऱ्या मैदानांवर खेळवा. खेळाबद्दल मत मांडणं हे त्यांचं काम आहे, त्यांना त्याचे पैसे मिळतात.”

याबाबत बोलताना हर्षा भोगले म्हणाले होते, “जर ते घरच्या मैदानावर खेळत असतील, तर त्यांना तशी खेळपट्टी मिळायला हवी, जी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. मी केकेआरच्या क्यूरेटरबद्दल काहीतरी ऐकलं आहे.” सुजान मुखर्जी हे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे पिच क्यूरेटर आहेत. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल आपल्या पिच क्यूरेटरच्या पाठीशी आहे. त्यांचं म्हणणं आहे की, सुजान मुखर्जी यांनी बीसीसीआयच्या नियमांचं पालन करून खेळपट्टी तयार केली आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार, कोणतीही फ्रँचायजी आपल्याला हवी तशी खेळपट्टी तयार करू शकत नाही. माध्यमातील वृत्तानुसार, हर्षा भोगले आणि सायमन डूल कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये समालोचन करताना दिसून येणार नाहीत. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे