Virat Kohli’s reaction on strike rate : आयपीएल २०२४ मधील ४३वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलळुरु यांच्यात खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना एकहाती जिंकत गुजरात जायंट्सवर ९ विकेट्सनी मात केली. आयपीएलच्या या हंगामातील आरसीबीचा हा तिसरा विजय आहे. या सामन्यात विल जॅकने शानदार शतक झळकावल्यामुळे त्याचा संघ सामना जिंकू शकला. या सामन्यात विल जॅकशिवाय विराट कोहलीनेही शानदार खेळी केली. आजच्या सामन्यात विराट खूपच आक्रमक दिसला आणि त्याने नाबाद ७० धावांचे योगदान दिले. सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन होणाऱ्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
विराट कोहली काय म्हणाला?
आपल्या स्ट्राईक रेटबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, “जे लोक स्ट्राइक रेटबद्दल आणि मी फिरकीविरुद्ध चांगला खेळत नाही बोलतात, हे तेच लोक आहेत ज्यांना याबद्दल बोलायला आवडते. पण माझ्यासाठी नेहमी संघाला सामना जिंकून देणे हेच ध्येय राहिले आहे. त्यामुळेच मी १५ वर्षांपासून हे करू शकलो आहे. तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही दररोज मेहनत करत असता.”
विराटने टीकाकारांना फटकारले –
विराट कोहली पुढे म्हणाला, “मला वाटत नाही की, जे लोक दुसऱ्यावर टीका करत असतात, त्या लोकांनी स्वतः अशा परिस्थितीचा सामना केला असेल. मला माहित आहे की बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे आहे. पण मी खरोखर याबद्दल विचार करत नाही. माझ्यासाठी हे फक्त माझे काम करणे आहे. लोक खेळाबद्दल त्यांचे विचार आणि समज याबद्दल बोलू शकतात. परंतु जे लोक खेळत आहेत त्यांना माहित आहे की काय चालले आहे. त्यामुळे आता आता माझ्यासाठी या गोष्टी सामान्य झाल्या आहेत.”
हेही वाचा – GT vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
विराट कोहलीने आयपीएल २०२४ मध्ये पूर्ण केल्या ५०० धावा –
विराट कोहलीने आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर विराटने यंदाच्या हंगामात ५०० धावांचा टप्पा पार केला. चालू हंगामात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासात कोहलीने एका हंगामात ५०० धावांचा आकडा गाठण्याची ही ७वी वेळ आहे. आयपीएलच्या चालू हंगामात त्याने ४ अर्धशतकं आणि एक शतकी खेळीही साकारली आहे. यासह कोहली आयपीएलच्या इतिहासात ८ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आला आहे.