मागील हंगाम संपल्यानंतर वीरेंद्र सेहवागने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा त्याग केला. परंतु या निर्णयाने माझ्या खेळाच्या दृष्टिकोनावर कोणताच परिणाम होणार नाही, असे सेहवागने स्पष्ट केले आहे.
‘‘मी संघाचा कर्णधार असो किंवा नसो, त्यामुळे कोणताच फरक पडत नाही. कर्णधारपदामुळे माझ्या खेळावर कोणताच परिणाम झाला नाही. नेतृत्व करताना माझ्या फलंदाजीवर त्याचे कधीच दडपण आले नाही,’’ असे आयपीएलच्या सहाव्या पर्वाला सज्ज होणाऱ्या सेहवागने सांगितले.
सेहवागसाठी नेतृत्व आणि कामगिरी या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, ज्या एकत्रित करता येत नाही. याविषयी तो म्हणाला, ‘‘कर्णधारपद आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी मी स्वतंत्रपणे सांभाळल्या आहेत. जर तुम्ही कर्णधारपदामुळे दडपण येते असे म्हणाल तर गेल्या हंगामात मी पाच सलग अर्धशतके आयपीएलमध्ये झळकावली आहेत आणि दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी सर्वाधिक धावा माझ्याकडूनच झाल्या आहेत.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘केव्हिन पीटरसन हा आमचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्यामुळे त्याची उणीव भासणे स्वाभाविक आहे. परंतु आमच्याकडे आणखीसुद्धा दर्जेदार खेळाडू आहेत. याशिवाय दिल्ली संघात १० विदेशी खेळाडू आहेत. केव्हिनची जागा घेऊ शकेल असा खेळाडू आम्हाला सापडल्यास आम्हाला आयपीएल चषकसुद्धा जिंकणे अवघड जाणार नाही.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा