वानखेडे स्टेडियमवर शनिवारी ख्रिस गेल नावाचे वादळ घोंगावणार, असा इशारा वेधशाळेने दिला होता. पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसारख्या बलाढय़ संघाला पराभूत करण्याची किमया मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर साधली. त्यामुळे सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा आयपीएल सामना जिंकणे मुंबई इंडियन्सला अजिबात जड जाणार नाही.
दोन सलग पराभवानंतर मुंबईच्या आव्हानापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण शनिवारी रात्री मुंबईने आपल्या नवव्या सामन्यात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि पुन्हा आपली ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने वाटचाल सुरू केली. आयपीएलचे सहावे पर्व आता मध्यावर आले असताना मुंबई इंडियन्स १० गुणांनिशी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. याचप्रमाणे वानखेडेवर मुंबईने आपला सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
शनिवारी सलग दुसऱ्या सामन्यात कप्तान रिकी पॉन्टिंगने स्वत:हून न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय साजरा केला. या आधीच्या सामन्यात शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला होता.
पॉन्टिंगने पुन्हा एकदा अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्वत:ची निवड केली नाही आणि सारे काही मुंबई इंडियन्ससाठी अनुकूल घडत गेले. वेस्ट इंडिजचा गुणी अष्टपैलू खेळाडू ड्वेन स्मिथला त्यामुळे संघात संधी मिळाली. स्मिथने चार सामन्यात खेळताना दोन अर्धशतके झळकावली आहेत. शनिवारी बंगळुरूविरुद्ध मिळविलेल्या मुंबईच्या विजयात स्मिथच्या दोन बळींचाही वाटा आहे.
वानखेडेवरील मागील तीन सामन्यांचा आढावा घेतल्यास मुंबईची फलंदाजी आता स्थिर झाल्याचे प्रत्ययास येते. मुंबईने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध ५ बाद २०९, पुणे वॉरियर्सविरुद्ध ३ बाद १८३ आणि शनिवारी बंगळुरूविरुद्ध ७ बाद १९४ धावा केल्या. मुंबईला यंदा ४०वे रणजी विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला बंगळुरूविरुद्ध संधी मिळाली आणि त्याने तीन बळी घेत त्याचे सोने केले.
स्मिथ आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला तंबूची वाट दाखविणारा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांच्यामुळे मुंबईला हा विजय प्राप्त करता आला. मुंबईला प्रग्यान ओझाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचीही उपयुक्तता भासली नाही. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि मिचेल जॉन्सन टिच्चून गोलंदाजी करीत आहेत.
दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या सहाव्या पर्वात लक्ष वेधले ते ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सला हरवून. आता मुंबईला हरवून गुणसंख्या १०पर्यंत नेण्यास पंजाबचा संघ उत्सुक आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टची कामगिरी ही पंजाबच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. परंतु पॉन्टिंगप्रमाणे गिलख्रिस्टला विश्रांती देण्यास अद्याप पंजाबचा संघ धजावलेला नाही. त्याच्या आठ सामन्यांत एकूण ९४ धावा झाल्या आहेत. मनदीप सिंगने आठ सामन्यांत २१९ धावा काढत आपले सातत्य दाखवले आहे. ऑस्ट्रेलियाचा आणखी एक फलंदाज डेव्हिड हसीने ८ सामन्यांत १६५ धावा केल्या आहेत. पण हसीच्या फलंदाजीतसुद्धा सातत्याचा अभाव आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर निभाव लावायचा तर पंजाबच्या फलंदाजांना अधिक ताकदीने लढा द्यावा लागेल.
पंजाबचा गोलंदाजीचा माराही समाधानकारक नाही. अनुभवी पीयूष चावलाला आठ सामन्यांत फक्त ३ बळी मिळाले आहेत.
प्रवीण कुमारने (८ सामन्यांत ९ बळी) आणि अझर मेहमूद (७ सामन्यांत ११ बळी) हे पंजाबचे महत्त्वाचे गोलंदाज आहेत.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.