गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळविलेल्या मनोधैर्य उंचावलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघास सोमवारी येथे राजस्थान रॉयल्सच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. घरच्या मैदानावर चेन्नईची बाजू वरचढ मानली जात आहे.
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने केलेल्या बहारदार कामगिरीमुळेच चेन्नईस कोलकाता संघाविरुद्ध विजय मिळविता आला. त्याच्या जोडीला द्वायने ब्राव्हो तसेच नव्याने करारबद्ध केलेले ख्रिस मॉरिस व मोहित शर्मा यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र चेन्नईपुढे पहिल्या फळीतील फलंदाजांचे अपयशाची मोठी समस्या आहे. मायकेल हसी याचा अपवाद वगळता पहिल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही. विशेषत: मुरली विजय व सुरेश रैना यांचे अपयश ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. गोलंदाजीत मोहित शर्मा याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर व वीरेंद्र सेहवाग हे महत्त्वाचे बळी घेतले होते. राजस्थानविरुद्ध चेन्नईला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला जडेजा, रविचंद्रन अश्विन व अल्बी मोर्कल यांचे मार्गदर्शन व साथ निश्चित मिळणार आहे.
राजस्थानपुढेही फलंदाजीबाबत समस्या आहे. कर्णधार राहुल द्रविड याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी अपेक्षेइतके सातत्य दाखविलेले नाही. चेन्नईविरुद्ध विजय मिळविण्यासाठी त्यांना शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी यांच्याकडूनही अव्वल दर्जाची कामगिरी अपेक्षित आहे. द्रविड यानेही आमच्या संघाची फलंदाजी अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची झालेली नाही असे कबूल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा