CSK Coach Stephen Fleming Big Statement On IPL 2023 Auction : चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनं आयपीएल २०२३ च्या लिलावाबाबत मोठा खुलासा केला आहे. माजी नेट गोलंदाज वरूण चक्रवर्तीला संघात खरेदी न केल्यानं सीएसकेला पश्चाताप झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चक्रवर्ती काही वर्षांसाठी सीएसकेचा नेट गोलंदाज होता आणि कर्णधार धोनीसह अनेक फलंदाजांना त्याने भेदक गोलंदाजी केली. चेपॉकवर आयपीएलचा पहिला सामना खेळताना कोलकाताच्या ऑफ स्पिनरने त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
फ्लेमिंगनं सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं, वरूणला लिलावात खरेदी न केल्यामुळं सीएसकेला अजूनही पश्चाताप होत आहे. वरुण चक्रवर्तीने नेटमध्ये गोलंदाजी करून अनेक फलंदाजांना घाम फोडला. आम्ही लिलावात त्याला खरेदी करू शकलो नाही. चक्रवर्तीला पंजाब किंग्जने २०१९ मध्ये ८ कोटी ४० लाख रुपयांत खरेदी केलं होतं आणि केकेआरने २०२० मध्ये चार कोटी रुपयात खरेदी करून वरुणला संघातच ठेवला आहे. रविवारी झालेल्या पराभवानंतर फ्लेमिंग म्हणाले, त्यांच्या संघाला परिस्थितीचा सामना करता आला नाही.
याचदरम्यान, केकेआरचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने रिंकू सिंगला आदर्श खेळाडू म्हणून संबोधित केलं. त्याने म्हटलं, “रिंकू फिरकी गोलंदाजीवर चांगला खेळतो. मागील दोन तीन सत्रात प्रथम श्रेणीत रिंकूने चांगली कामगिरी केली आहे. कोणत्या परिस्थितीत कसं खेळावं, त्याला चांगलं माहिती आहे. घरेलू क्रिकेटमध्ये अनेक आव्हानात्मक खेळपट्टी मिळतात आणि मला त्याने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल खूप आनंद आहे.”