Chennai Super Kings Key Bowlers to Miss IPL 2024 Matches: चेपॉकच्या मैदानावर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. आयपीएलमधील चॅम्पियन चेन्नईचा संघ या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. चेन्नईने केलेली १६२ धावसंख्या ही दव पाहता अगदी सहज गाठण्याजोगी होती आणि पंजाबनेही अगदी तेच केले. या सामन्यात चेन्नईची मोठी अडचण ठरली ते म्हणजे संघातील मुख्य गोलंदाजांची अनुपस्थिती. संघाचे बहुतेक मुख्य वेगवान गोलंदाज संघाबाहेर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईचे महत्त्वाचे गोलंदाज उपलब्ध नसल्याने संघाला त्याचा मोठा फटका बसत आहे. दीपक चहरची दुखापत संघासाठी मोठा धक्का आहे. किरकोळ दुखापतीमुळे या हंगामातील पूर्वीचे दोन सामने न खेळलेल्या चहरला बुधवारच्या सामन्यात दोन चेंडू टाकल्यानंतर पुन्हा त्रास झाला,ज्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. पंजाबविरूद्धचा संपूर्ण सामना संपेपर्यंत चहर मैदानात परतला नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरने त्याचे षटक पूर्ण केले. तर संघाचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी वक्तव्य देताना सांगितले की, “आम्ही दीपक चहरच्या दुखापतीबद्दल चिंतित आहोत. फिजिओ आणि डॉक्टरांच्या तपासणीनंतर चांगला रिपोर्ट यावा, अशी मला आशा आहे.”

दीपक चहरसोबत चेन्नईचे इतरही गोलंदाज संघाबाहेर

मुस्तफिझूर रहमान
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान झिम्बाब्वे विरुद्धची घरच्या मैदानावरील आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका खेळण्यासाठी मायदेशी परतला आहे.

तुषार देशपांडे
तुषार देशपांडेची तब्येत ठीक नसल्याने पंजाबविरूद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी तो चेपॉकवर पोहोचला नव्हता. त्याच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाहीत.

हेही वाचा- T20 World Cup मधील टीम इंडियाचे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता खेळवले जाणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मथिशा पथिराना आणि महिश तीक्ष्णा
मथिशा पथिरानाही पंजाबविरूद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर झाला. यापूर्वी पथिराना दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकला होता. यानंतर आता पथिराना आणि तीक्ष्णा आगामी टी-२० विश्वचषक २०२४ च्या व्हिझाच्या कामासाठी मायदेशी परतणार आहेत.

सीएसकेचे कोच फ्लेमिंग यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की, दीपक चहरची दुखापत गंभीर आहे, त्याला मैदानात परतण्यासाठी कदाचित वेळ लागेल. चेन्नई सुपर किंग्सने १० सामने खेळले आहेत, त्यांचे ग्रुप स्टेजमध्ये ४ सामने बाकी आहेत. संघ सध्या 10 गुणांसह टॉप-४ मध्ये असला तरी, उर्वरित ४ सामन्यांमध्ये चेन्नईला किमान ३ सामने जिंकणे आवश्यक आहे, तरच ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

हेही वाचा- सुरेश रैनाच्या मामेभावासहित आणखी एकाचा हिट अँड रन केस प्रकरणात मृत्यू, नेमकं काय घडलं?

माजी भारतीय आणि CSKचा खेळाडू राहिलेला इरफान पठाणच्या मते चेन्नई मोठ्या संकटात आहे आणि जर गोलंदाज वेळेवर परतले नाहीत तर त्यांची प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता संपुष्टात येईल.

“चेन्नईने मैदानात दव असूनही हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला आणि त्याचे कारण म्हणजे त्यांचे ट्रम्प कार्ड, पाथीराना. तो मैदानात कधी परतेल हे आपल्याला माहीत नाही. मुस्तफिझूर रहमान आतापासून पुढील काही खेळणार नाही. दीपक चहरला दुखापत झाली आहे. महत्त्वाचा गोलंदाज असलेल्या तुषार देशपांडेची तब्येत ठीक नाही. सीएसकेसाठी योग्य वेगवान गोलंदाज उपलब्ध नाही, त्यामुळे संघ मोठ्या संकटात आहे आणि ही समस्या कायम राहिल्यास ते प्लेऑफला मुकतील,” असं इरफान पठाण स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai super kings in big trouble as deepak chahar injured and key bowlers to miss upcoming ipl matches know details bdg