चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला आयपीएल २०२४ मध्ये दुखापतींचा सामना करावा लागत आहे. यादरम्यानचं आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी चेन्नई संघाच स्टार गोलंदाज मायदेशी परतला आहे. सध्या चेन्नईचा पंजाब किंग्सविरूद्धचा सामना खेळवला जात आहे.
मुस्तफिजूर रहमाननंतर चेन्नईचा अजून एक गोलंदाज मायदेशी
मुस्तफिजूर रहमाननंतर चेन्नई संघाचा स्टार गोलंदाज मथिशा पथिराणाही श्रीलंकेला परतला आहे. गेल्या काही सामन्यांपासून पथिराणा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी पथिराणा मायदेशी परतल्याची माहिती स्वत चेन्नई सुपर किंग्सने दिली आहे. या दुखापतीमुळे तो काही सामन्यांना मुकला. पथिराणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने यंदाच्या मोसमात विजय मिळवला आहे. वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराणाने IPL 2024 मध्ये सहा सामने खेळले आणि ७.६८ च्या इकॉनॉमीने १३ विकेट घेतल्या.
चेन्नई सुपर किंग्स संघाचे महत्त्वाचे वेगवान गोलंदाज संघाबाहेर झाले आहेत. मुस्तफिजूर रहमान हा झिम्बाब्वेविरूद्धची टी-२० मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला परतला आहे. त्यानंतर आता मथिशा पथिराणाही दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. तर दीपक चहरही दुखापतीमुळे त्रस्त आहे. संघाचे तीन महत्त्वाचे गोलंदाज खेळत नसल्याचा फटका चेन्नईला नक्कीच बसणार आहे. आज सुरू असलेल्या पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईने मिचेल सँटनरला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे.