Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders IPL Match Updates : आयपीएलचा १६ व्या हंगामाताली ३३ वा सामना ईडन गार्डनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेनं चौफेर फटकेबाजी केली.
ऋतुराजने २० चेंडूत ३५ धावांची खेळी साकारल्याने चेन्नईला पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात मिळाली. कॉनवे अर्धशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनं मैदान गाजवलं. रहाणेनं केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेत २९ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकार ठोकून ७१ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकांत दोनशेचा टप्पा पार करत ४ विकेट्स गमावत कोलकाताला विजयासाठी २३६ धावांचं आव्हान दिलं आहे.
कोलकाता फिरकीपटू सुयश शर्माने गुगली टेंडू फेकून ऋतुराजला ३५ धावांवर असताना क्लीन बोल्ड केलं. पण त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेवॉन कॉनवेनं सावध खेळी करत धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. परंतु, वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉनवे ५६ धावांवर बाद झाल्यानंतर सीएसकेला दुसरा धक्का बसला. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं आक्रमक अंदाजात फलंदाजी करत चेन्नईच्या धावसंख्येची गती वाढवली. तसंच शिवम दुबेनंही चौकार-षटकारांचा पाऊस पाडत कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मात्र, कोलकाताचा गोलंदाज कुलवंत खेज्रोलियाने शिवमला ५० धावांवर बाद केलं आणि कोलकाताला ब्रेक थ्रू दिला. शिवमने २१ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५० धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली.