Devon Conway Father Passed Away: आयपीएल २०२५ स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत ९ गडी राखून विजयाची नोंद केली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. हे पाहताच क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं असं काय घडलं की, चेन्नईच्या खेळाडूंना काळी पट्टी बांधून मैदानावर उतरावं लागलं. आता चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

डेव्हॉन कॉनवेच्या वडिलांचं निधन

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा आक्रमक फलंदाज डेव्हॉन कॉनवे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. सामन्यानंतर समालोचन करत असलेल्या हर्षा भोगले यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. ते सांत्वना देत म्हणाले की, डेव्हॉन कॉनवेला आता न्यूझीलंडला जावं लागेल. दरम्यान आज (२१ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे. यासह त्यांनी डेव्हॉन कॉनवेचा आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

डेव्हॉन कॉनवेच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ११ एप्रिलला तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेत त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला ९४ धावा करता आल्या आहेत.

मुंबईचा चेन्नईवर शानदार विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने ५० धावा केल्या. चेन्नईला २० षटकअखेर ५ गडी बाद १७६ धावा करता आल्या.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने देखील गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने रोहितला चांगली साथ दिली. या डावात त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत नाबाद ६८ धावांची खेळी केली. यासह मुंबईने हा सामना ९ गडी राखून आपल्या नावावर केला.