* चेन्नईचा राजस्थान रॉयल्सवर ५ विकेट्सनी विजय
* माइक हसीची शानदार खेळी * वॉटसनचे शतक व्यर्थ
शेन वॉटसनने केलेले तडाखेबंद शतक आणि राजस्थानने उभारलेला १८५ धावांचा डोंगर. या दोन्हीचे अजिबात दडपण न घेता माइक हसीने सहजसुंदर खेळी साकारली आणि चेन्नईला ५ विकेट्सनी दिमाखदार विजय मिळवून दिला. हसीने तब्बल १३ चौकार आणि एका षटकारासह ५१ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. एक चोरटी धाव घेण्याचा धोनीचा प्रयत्न फसला आणि हसी धावचीत झाला. त्यापाठोपाठ जडेजाही तंबूत परतला आणि चेन्नईसाठीचे समीकरण अचानक २१ चेंडूत ४२ धावा असे झाले.. महेंद्र सिंग धोनी खेळत असतानाही जेम्स फॉल्कनरने १७व्या षटकात केवळ ३ धावा दिल्या. मात्र कूपरच्या षटकांत १२ धावांसह विजयाचे पारडे चेन्नईकडे झुकले. त्यानंतर फॉल्करने आपल्या अखेरच्या षटकांत केवळ ६ धावा देत धोनीला माघारी धाडत राजस्थानच्या आशा जिवंत ठेवल्या. शेवटच्या षटकांत ११ धावांची आवश्यकता होती. मात्र ड्वेन ब्राव्होने ही जबाबदारी सार्थपणे पेलत चेन्नईचा घरच्या मैदानावरची विजयी परंपरा कायम राखली. ब्राव्होने ९ चेंडूत नाबाद १५ धावांची खेळी केली.
दरम्यान या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. मुरली विजय केवळ ३ धावा करुन बाद झाला. मात्र या धक्क्यामुळे चेन्नईच्या इराद्यावर कोणताही परिणाम झाला नाही. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या माइक हसीने सुरेश रैनाला साथीला घेत दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची वेगवान भागीदारी केली.
या जोडीने षटकामागे नऊच्या सरासरीने धावांची टांकसाळ उघडली. या जोडीचा झंझावात रोखण्यासाठी द्रविडने ७ गोलंदाजांचा उपयोग केला. अखेर फॉल्कनरच्या चेंडूवर रैना पायचीत झाल्याने ही भागीदारी संपुष्टात आली. मात्र हसीने आक्रमण सुरुच ठेवले. हसीने धोनीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी २१ चेंडूत ४२ धावा फटकावल्या. हसी बाद झाल्यानंतर राजस्थानने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र ड्वेन ब्राव्होने हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत .
तत्पूर्वी शेन वॉटसनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने १८५ धावांचा डोंगर उभारला. शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणे जोडीने ४४ चेंडूतच ७१ धावांची सलामी दिली. यामध्ये रहाणेचा वाटा होता केवळ १६ धावांचा. वॉटसनने चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. दिशांत याग्निक आणि राहुल द्रविड वॉटसनची साथ देऊ शकले नाहीत.
वॉटसन-स्टुअर्ट बिन्नी जोडीने चौथ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. ब्राव्होच्या गोलंदाजीवर दोन धावा पूर्ण करत वॉटसनने यंदाच्या हंगामातल्या पहिल्या शतकाची नोंद केली. मात्र शतकानंतर लगेचच तो बाद झाला. त्याने ६१ चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकारांची बरसात करत १०१ धावांची तडाखेबंद खेळी केली. स्टुअर्ट बिन्नीने एक षटकार आणि ३ चौकारांसह २२ चेंडूत ३६ धावांची उपयुक्त खेळी केली. चेन्नईतर्फे रवीचंद्रन अश्विन आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी २ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ४ बाद १८५ (शेन वॉटसन १०१, स्टुअर्ट बिन्नी ३६, आर.अश्विन २/२०) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : १९.५ षटकांत ५ बाद १८६ (माइक हसी ८८, सुरेश रैना ५१, जेम्स फॉल्कनर ३/२०)
सामनावीर : माइक हसी
              संघ             सा    वि    हा     गु
चेन्नई सुपर किंग्स                ७    ५    २    १०
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू            ७    ५          २    १०
सनरायजर्स हैदराबाद              ७    ५    २    १०
राजस्थान रॉयल्स               ७    ४    ३     ८
किंग्स इलेव्हन पंजाब             ६     ३    ३    ६
मुंबई इंडियन्स                           ६    ३    ३    ६
कोलकाता नाइट रायडर्स          ६    २    ४    ४
पुणे वॉरियर्स                            ७    २    ५    ४
दिल्ली डेअरडेव्हिल्स               ७    १    ६    २