धोनीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईचा ५ विकेट्स राखून विजय
‘अनहोनी को होनी कर दे.. धोनी’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा क्रिकेटरसिकांना आला. विजयासाठी कितीही चेंडूंमध्ये कितीही धावा असोत, महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर असेल तर सारे काही शक्य आहे, हे गुरुवारच्या सामन्यात धोनीने दाखवून दिले. शिखर धवनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने १५९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ अडचणीत सापडला असताना धोनीने नाबाद ६७ धावांची तडाखेबंद खेळी साकारल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला ५ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवता आला.
विजयासाठी १६० धावांचा पाठलाग करताना मायकेल हसीने दणकेबाज सुरुवात संघाला करून दिली. त्याने २६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ४५ धावांची खेळी साकारली आणि मुरली विजयबरोबर (१८) ६५ धावांची सलामी दिली. पण अमित मिश्राला फटका मारण्याच्या नादात हसी दुर्दैवीरीत्या बाद झाला. हसी बाद झाल्यावर धोनीने ३७ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावांची कर्णधाराला साजेशी खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, हैदराबादचा सलामीवीर शिखर धवन झोकात यंदाच्या हंगामातील पहिला सामना खेळला. एका बाजूने फलंदाज बाद होत असतानाही धवनने एक बाजू लावून धरली आणि त्यामुळेच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला १५९ धावा करता आल्या. धवनने ४५ चेंडूंत चौकारांचे दशक लगावत नाबाद ६३ धावांची अमुल्य खेळी साकारली. अखेरच्या काही षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या आशिष रेड्डीने १६ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटाकारांच्या जोरावर नाबाद ३६ धावा फटकावत धवनसह सातव्या विकेटसाठी ४३ धावांची अभेद्य भागीदारी रचल्यामुळे हैदराबादला दीडशे धावांचा ओलांडता आला.
संक्षिप्त धावफलक
सनराजर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद १५९ (शिखर धवन नाबाद ६३, आशिष रेड्डी नाबाद ३६; मोहित शर्मा २/३३) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.४ षटकांत ५ बाद १६० (महेंद्रसिंग धोनी नाबाद ६७, मायकेल हसी ४५; अमित मिश्रा ३/२६)
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा