Mumbai Indians Coach Mark Boucher Press Conference : मुंबई इंडियन्सचं आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्याचं स्वप्न तुटलं आहे. मुंबईचा दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने ६२ धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडली आहे. मुंबईचा या सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चरसारखे जबरदस्त गोलंदाज नसल्याने संघावर खूप परिणाम झाला. या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीमुळं संघात एक मोठी गॅप पडली, असं बाऊचर म्हणाले.
बाऊचर पुढे म्हणाले, जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्ससाठी मागील हंगामात एकही सामना खेळला नाही. या हंगामात त्याने पुनरागमन नक्की केलं, पण या दुखापतीमुळं तो काही सामने खेळू शकला नाही. जेव्हा जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला, तेव्हा मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात मोठा धक्का होता. अशा परिस्थितीमुळं दोन दिग्गज गोलंदाज मुंबईच्या संघातून बाहेर झाले.
मार्क बाऊचरच्या म्हणण्यानुसार, या गोलंदाजांच्या जाण्यामुळं संघाचं मोठं नुकसान झालं. त्यांनी गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हटलं की, या सामन्यात बुमराह आणि जोफ्रा उपलब्ध नव्हते. हे दोघेही जबरदस्त गोलंदाज आहेत. जर तुम्ही तुमच्या अशाप्रकारच्या गोलंदाजांना मिस करत असाल, तर संघाचं खूप मोठं नुकसान होतं. मी कुणावरही आरोप करत नाही. पण खेळात दुखापत होत असते आणि तुम्हाला त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.