किंग्ज इलेव्हन पंजाबचे तुटपुंजे आव्हान हैदराबाद सनरायजर्स सहजपणे पार करेल अशी अपेक्षा होती. पण साधा-सरळ वाटणारा हा सामनासुद्धा उत्तरार्धात रंगतदार ठरला. हैदराबादला १२ चेंडूंत १८ धावांची आवश्यकता असताना हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगेल, अशी आशा होती. पण डावखुरा फलंदाज थिसारा परेराला ते मुळीच मान्य नव्हते. अझर मेहमूदच्या १९व्या षटकात त्याने पहिल्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकारांची बरसात केली आणि विजयाचे पारडे सनरायजर्सकडे झुकले. त्यांच्या हनुमा बिहारीने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर परेराने ११ चेंडूंत नाबाद २३ धावा काढल्या. या विजयानिशी सनरायजर्स हैदराबादने १० गुणांसहित गुणतालिकेत अव्वल स्थानावर मजल मारली आहे.
त्याआधी, फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांनी आत्मघातकी खेळ करीत मोठी धावसंख्या रचण्याची संधी गमावली. त्यामुळेच त्यांनी हैदराबाद सनरायजर्स संघापुढे विजयासाठी १२४ धावांचे माफक आव्हान ठेवले.
पंजाबकडे अनुभवी फलंदाजांचा समावेश असूनही त्यांनी नाणेफेक जिंकून भक्कम धावसंख्या रचण्याची संधी दवडली. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट (२६), पीयुष चावला (२३), डेव्हिड हसी (२२) यांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. करण शर्मा याने एकाच षटकात गिलख्रिस्ट व पॉल व्हल्थाटी यांना बाद करीत पंजाबची दाणादाण उडविली. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या चावलाने दोन षटकार व एक चौकार अशी फटकेबाजी केली. त्याने हसीच्या साथीत केलेली ४० धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज ईलेव्हन पंजाब : २० षटकांत ९ बाद १२३ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट २६, पीयुष चावला २३, डेव्हिड हसी २२; इशांत शर्मा २/२९, करण शर्मा २/१९) पराभूत वि. हैदराबाद सनरायजर्स : १८.५ षटकांत ५ बाद १२७ (अक्षत रेड्डी १९, हनुमा विहारी ४६, थिसारा परेरा नाबाद २३; मनप्रीत गोनी २/२४)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा