IPL 2025 LSG vs CSK Match Highlights in Marathi: शिवम दुबेचा चौकार आणि चेन्नईने ५ सलग पराभवांनंतर हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. एम एस धोनी आणि शिवम दुबे यांच्या फटकेबाजीसह चेन्नई सुपर किंग्सने पाच पराभवांनंतर विजय मिळवला आहे. चेन्नईने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनौविरूद्ध सामन्यात चेन्नई संघाने सुरूवातीपासूनच चांगली कामगिरी करत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली. लखनौने वेळोवेळी सामन्यात पुनरागमन केलं, पण विजयापासून मात्र दूर राहिले.

चेन्नई सुपर किंग्सने अखेर पराभवाची मालिका संपवली आहे. सलग पाच सामने गमावल्यानंतर, चेन्नईने हंगामातील दुसरा विजय नोंदवला. लखनौविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला १६७ धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि संघाने अखेरच्या षटकात हे लक्ष्य गाठले. चेन्नईच्या विजयात एमएस धोनीची कामगिरी मोलाची ठरली. या खेळाडूने ११ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि १ षटकार पाहायला मिळाला. त्याच्याशिवाय शिवम दुबेने ३७ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार नाबाद ४३ धावा केल्या.

लखनौकडून रवी बिश्नोईने २ विकेट्स तर दिग्वेश, आवेश आणि एडन मारक्रम यांनी १-१ विकेट घेतली. या सामन्यात संघाचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलेल्या रवी बिश्नोईला त्याच्या स्पेलमधील अखेरचं षटक न देण्याचा संघाला फटका बसला.

लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना १६६ धावा केल्या. संघाचा सलामीवीर मारक्रम फक्त ६ धावा करू शकला. निकोलस पुरनही या सामन्यात अवघ्या ८ धावा करत बाद झाला. तर मिचेल मार्शने ३० धावांची खेळी खेळली. लखनौ संघाचे तिन्ही मोठे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरल्याचा संघाला फटका बसला. कर्णधार पंतने कठीण काळात ६३ धावांची खेळी खेळली. बदोनीने २२ धावा केल्या पण संघ फक्त १६६ धावांपर्यंतच पोहोचू शकला.

चेन्नईकडून पाथिराना आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले. अंशुल कंबोज आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. नूर अहमदला विकेट मिळाली नसली तरी त्याे ४ षटकांत फक्त १३ धावा दिल्या. धोनीला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि विकेटकीपिंगसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.