CSK vs MI IPL 2025 Highlights in Marathi: मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे आयपीएलमधील पहिला सामना गमावला आहे. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा ४ विकेट्सने पराभव करत आपलं खातं उघडलं आहे. मुंबईने १५५ धावाच केल्या असल्या तरी त्यांनी चेन्नईला सहज विजय मिळवू दिला नाही. मुंबईने अखेरच्या षटकापर्यंत चेन्नईला विजयासाठी वाट पाहायला लावली. पण चेपॉकचा अभेद्य किल्ला मुंबईचा संघ भेदू शकला नाही.
चेन्नई सुपर किंग्सला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ चेंडूत ४ धावांची गरज असताना रचिनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्स संघाने सततच्या विकेट्स गमावल्याने मोठी धावसंख्या उभारू शकले नाही. पण मुंबई इंडियन्सच्या संघाने अखेरपर्यंत हार मानली नाही आणि सीएसकेला विजयासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात पदार्पणवीर युवा खेळाडू विघ्नेश पुथूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवातही चांगली झाली नाही. राहुल त्रिपाठी दुसऱ्या षटकातच बाद झालाय पण यानंतर ऋतुराज गायकवाडने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावत मुंबई इंडियन्सवर दबाव आणला.
ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा करत बाद झाला. पण त्याच्या खेळीसह त्याने मुंबईला बॅकफूटवर टाकले. यानंतर सर्व फलंदाज एका टोकावरून विकेट गमावत होते, पण रचिन रवींद्रने दुसऱ्या टोकाकडून सीएसकेचा डाव सांभाळत होता. रचिनने ४५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावांची नाबाद खेळी केली. तर जडेजा १७ धावा करत बाद झाला.
पण मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विघ्नेश पुथूरने त्याच्या आयपीएल पदार्पणात ३ विकेट्स घेतले. त्याच्या ३ विकेट्समुळे सीएसकेचा विजय थोडा कठिण झाला होता. विघ्नेश पुथूरने या सामन्यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा अशा मोठ्या आणि ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. मुंबई इंडियन्स चांगली धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली, ज्याचा फटका त्यांना बसला.
मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबईची सुरूवात खूपच खराब झाली, रोहित शर्मा ३ चेंडू खेळून डकवर बाद झाला. यानंतर रायन रिकल्टन १३ धावा, विल जॅक्स ११ धावा करत बाद झाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. अर्धशतकी भागीदारी करत मुंबई इंडियन्सला १०० धावांपर्यंत नेले.
यानंतर रॉबिन मिंज ३ धावा, नमन धीर १७ धावा, सँटनर ११ धावा करत बाद झाले. तर दिपक चहरने २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दिपक चहरने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. यासह मुंबई इंडियन्सने ९ बाद १५५ धावा केल्या आहेत आणि सीएसकेला विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य दिले. सीएसकेकडून नूर अहमदने ४ विकेट्स घेत सामना फिरवला. तर खलील अहमदने मुंबईला सुरूवातीचे विकेट घेत धक्के दिले आणि ३ विकेट्स नावे केले. तर नॅथन एलिस आणि अश्विन यांनी १-१ विकेट घेतली.