IPL 2025 MS Dhoni Retirement Rumour: आयपीएल २०२५ च्या मध्यातच धोनी निवृत्ती घेणार अशी चर्चा दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यात सुरू होती. सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेने लक्ष वेधलं होतं. दरम्यान धोनीचे आई-वडिल पहिल्यांदाच त्याचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना अधिक वेग आला. पण धोनी खरंच निवृत्ती घेणार आहे का? यावर संघाचे कोच स्टिफन फ्लेमिंग यांनी उत्तर दिलं आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यापूर्वी धोनी या सामन्यात पुन्हा एकदा संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे, अशी चर्चा होती. सीएसकेचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो दिल्लीविरूद्धचा सामना खेळणार नाही, अशी चर्चा असल्याने धोनी नेतृत्त्व करेल असे म्हटले जात होते. यानंतर धोनी निवृत्ती घेईल अशी चर्चा रंगली. पण असं काहीचं घडलं नाही. कारण ऋतुराज सामन्यासाठी मैदानात उतरला होता.

तसेच, सामन्याच्या आधी समालोचकांनी सांगितले होतं की या सामन्यासाठी धोनीचे आईबाबा देखील आले आहेत, जे धोनीच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला खेळताना पाहण्यासाठी आले आहेत. सामना सुरू असताना धोनीचे आई-वडिल स्क्रिनवर दिसले, याचबरोबर त्याची पत्नी आणि लेकही उपस्थित होते. संपूर्ण कुटुंब उपस्थित असलेलं पाहताच धोनी खरंच निवृत्ती जाहीर करेल असं चित्र होतं. पण सामन्यानंतर संघाच्या कोचने यावर उत्तर दिलं आहे.

सामना संपल्यानंतर धोनी किंवा त्याची फ्रँचायझी चेन्नईकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरी हा धोनीचा शेवटचा सामना होता का हा प्रश्न चाहत्यांच्या मनात कायम होता. संघाच्या पराभवानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्टपणे नाकारले.

कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, अफवा थांबवणं हे माझं काम नाही. मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला अजूनही त्याच्याबरोबर काम करायला मजा येतेय. तो अजूनही एकदम मजबूत दिसत आहे. मी आजकाल त्याला निवृत्तीबद्दल विचारतही नाही.”

स्टीफन फ्लेमिंगच्या वक्तव्यानंतर धोनी आयपीएल 2025 च्या मध्यात निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. चेन्नईचा पुढचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध ८ एप्रिलला मुल्लानपूर येथे होणार आहे.