चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी आयपीएल २०२३ची अंतिम फेरी संस्मरणीय ठरली. एम.एस. धोनीच्या सीएसकेने गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर थरारकरित्या पराभव करून पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयामुळे सीएसकेने मुंबई इंडियन्सची बरोबरी करत सर्वाधिक यशस्वी आयपीएल फ्रँचायझी बनली आहे, मुंबईकडे देखील पाच आयपीएल किताब आहेत. हा विजय CSK चाहत्यांसाठी अविश्वसनीय होता, जे त्यांच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षिस समारंभात धोनी काय निर्णय घेतो? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते.
केवळ स्टेडियममध्येच नाही, तर सीएसकेच्या चाहत्यांनी टीव्ही स्क्रीनवर सामना पाहण्याचा आनंद लुटला. व्हायरल झालेला एक व्हिडिओ हा एका मुलाचा आहे. शेवटच्या चेंडूवर जडेजाने चौकार मारून सीएसकेला विजयी केले त्यावेळी त्या मुलाची रिअॅक्शन फार विचित्र अशी होती. चेन्नईच्या रोमहर्षक विजयानंतर ज्या भयानक पद्धतीने तो नाचत होता त्याचा तो जल्लोष पाहून शेजारी असणारे मुले देखील थोडी घाबरली. पण नंतर ते सुद्धा या आनंद उत्सवात सहभागी झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सला (DLS) पाच विकेट्सने पराभूत करून पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एम.एस. धोनीने त्याच्या संभाव्य निवृत्तीबद्दल एक मोठी अपडेट दिली. सर्वाधिक आयपीएल विजेतेपदांसह कर्णधार म्हणून रोहित शर्माची बरोबरी करणाऱ्या सीएसकेच्या कर्णधाराने सांगितले की, “मी निवृत्ती जाहीर करणे ही “सोपी गोष्ट” असेल, परंतु मला पुढील नऊ महिने प्रशिक्षण द्यायचे असून २०२४चा हंगामात खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे.”
धोनी सामन्यानंतर म्हणाला, “निवृत्तीचे उत्तर शोधत आहात? परिस्थितीनुसार, माझ्यासाठी निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे असे तुम्हाला वाटत असले तरी या वर्षात मी कुठेही गेलो तरी मला जेवढे प्रेम आणि आपुलकी दाखवण्यात आली आहे त्यावरून मला वाटते की माझ्यासाठी ही सोपी गोष्ट असेल. त्याबाबत केवळ मी इतकेच म्हणेन की खूप खूप धन्यवाद!”
पुढे माही म्हणाला की, “माझ्यासाठी कठीण गोष्ट म्हणजे नऊ महिने कठोर परिश्रम करणे आणि परत येऊन आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळणे. पण बरेच काही हे माझ्या शरीरावर अवलंबून असून ते ठरवण्यासाठी ६-७ महिन्यांचा कालावधी आहे. चाहत्यांना हे माझ्याकडून मिळालेल्या भेटवस्तूसारखे असेल. माझ्यासाठी हे सोपे नाही परंतु त्यांनी ज्या प्रकारे त्यांचे प्रेम आणि आपुलकी दाखवली आहे, त्यासाठी मला अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीचे कौतुक करताना रवी शास्त्री म्हणाले, “ज्यावेळी धोनी थांबेल त्यावेळी तो आपल्या मागे आयपीएलमध्ये एक मोठी परंपरा सोडून जाणार आहे. चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये त्याला थाला म्हटले जाते. झारखंडसारख्या भागातून येऊन दक्षिण भारतात इतकी लोकप्रियता मिळवणे, ही गोष्ट त्याची महानता सिद्ध करते. इतकी प्रसिद्धी कोणाला मिळणे, अशक्य गोष्ट आहे.”