कोलकातामध्ये जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) बैठकीत यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या समावेशाबाबतच्या परवानगीचा विषय गाजणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीत चेन्नई सुपरकिंग्जचे भवितव्यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि शशांक मनोहर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, कार्यकारी समितीच्या या बैठकीत आयपीएलमधील चेन्नई संघाचा मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंट्स कंपनीला संघाची मालकी ‘चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमिटेड’ या नव्याने तयार करण्यात आलेल्या कंपनीकडे सोपविण्याची परवानगी कोणी दिली यावर चर्चा केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत इंडिया सिमेंट्स कंपनीला चेन्नई संघाची मालकी चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट लिमिटेड या कंपनीला बहाल करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आयपीएलच्या प्रशासकीय समितीला नसल्याच्या मुद्द्यावरून रान पेटणार आहे. चेन्नई संघाच्या मालकी विस्थापनाबाबत बहुतेक सदस्यांना हा निर्णय कोणी आणि का घेतला? असा प्रश्न पडल्याचे बीसीसीआयच्या एका सदस्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले. त्यामुळे या बैठकीत चेन्नई सुपरकिंग्जच्या भवितव्यावर चर्चा होऊन ठोस निर्णय होण्याचे संकेत आहेत.
दरम्यान, अध्यक्ष दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर या बीसीसीआयच्या नव्या कार्यकारिणीने यंदा विदर्भ क्रिकेट असोसिएशन, गुजरात क्रिकेट असोसिएशनला देखील बैठकीचे निमंत्रण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा