IPL २०२० स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असून आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण गेला आठवडा हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूपच वेदनादायी गेला. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले. संघाला आणखी एका आठवड्याच्या क्वारंटाइनला सामोरं जावं लागलं. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन क्रिकेटपटूंसह आणखी १२ सहाय्यक कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सोमवारी कर्णधार धोनीसह संपूर्ण संघाची, सहाय्यक सदस्यांची पुन्हा नव्याने चाचणी घेण्यात आली. त्यात सारे करोनाग्रस्त खेळाडू करोनामुक्त झाल्याचे निदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल १४ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर साऱ्यांचे पुढील चाचणीकडे लक्ष होते. पण टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, CSKच्या शिबिरासाठी आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. सर्व सदस्यांची व खेळाडूंची सोमवारी करोना चाचणी घेण्यात आली. त्यात सर्व खेळाडू व सहाय्यक कर्मचारी करोना निगेटिव्ह आढळले. करोनावर मात केल्यानंतर दीपक चहरने ट्विट करून आपल्या तंदुरूस्तीची माहिती दिली. “तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि प्रेमासाठी खूप खूप आभार. मी आता तंदुरूस्त आहे. स्वत:ला अधिक तंदुरूस्त ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. लवकरच मी मैदानावर क्रिकेट खेळताना दिसेन. माझ्यावर असेच प्रेम करत राहा”, असं ट्विट त्याने केलं.

दरम्यान, आता सर्व खेळाडूंची आणखी एक करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून प्रशिक्षण शिबिरांना सुरूवात केली जाणार आहे. पण दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना मात्र प्रशिक्षण शिबिरात दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण शिबिरात येण्यास त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच, मंगळवारी दाखल झालेले फाफ डू प्लेसिस आणि लुंगी एन्गीडी हे दोन परदेशी क्रिकेटपटूदेखील क्वारंटाइन झाले आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk ipl 2020 good news deepak chahar coronafree tweets his recovery give thanks to fans vjb