भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन मुद्दे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. आधी चेन्नईच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली. त्यानंतर रैनाने IPL 2020मधून माघार घेतली. दोन दिवसांनी त्याच्या माघारीमागे धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचे CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. नंतर त्यांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर रैनाने स्वत: मुलाखत देत CSKशी कोणताही वाद नसल्याचं सांगितलं. पण त्याचसोबत घर आणि कुटंबीयांना माजी गरज असल्याचेही सांगितलं. अशा परिस्थितीत रैना CSKच्या संघासोबत या हंगामात खेळेल की नाही याबाबत थोडी शंकाच आहे.
सुरेश रैना हा चेन्नई संघाचा आधारस्तंभ आहे. त्याने अनेक सामने चेन्नईला एकहाती जिंकवून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे तो चेन्नई संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे त्याच्या माघारीमुळे आता चेन्नईसमोर उपकर्णधारपदाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पण चाहत्यांना मात्र नवा उपकर्णधार कोण असेल? याचा CSK पत्ता लागू देत नाहीये. नुकताच एका चाहत्याने ट्विटरवरून यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर CSKच्या अधिकृत अकाऊंटवरून भन्नाट उत्तर देण्यात आलं.
एका ट्विटर युजरने CSKला टॅग करत प्रश्न केला की आता आपला उपकर्णधार (vice captain) कोण असणार आहे? त्यावर CSKकडून अतिशय झकास असं उत्तर देण्यात आलं. “Wise captain irukke bayam yen? म्हणजेच आपल्याकडे हुशार कर्णधार (Wise captain) असताना घाबरायचं कशाला?”, असं उत्तर CSKने दिलं.
Wise captain irukke bayam yen?
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 2, 2020
CSKबाबत बोलताना रैना म्हणाला…
“CSK माझं कुटुंब आहे. धोनी माझ्यासाठी खूप जवळची आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यासाठी माघारीचा निर्णय खूप कठीण होता. पण माझ्यात आणि CSKमध्ये कोणताही वादविवाद नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी सध्या इथे क्वारंटाइन असलो तरीही माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. कुणी सांगावं… कदाचित मी तुम्हाला पुन्हा एकदा CSKच्या कॅम्पमध्येही दिसेन”, असे रैनाने सांगितलं.