सुरुवात कशीही झाली तरी मोक्याच्या क्षणी जो बाजी मारतो, त्यालाच सिकंदर म्हणतात आणि हेच मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये दाखवून दिले. अंतिम फेरीत चॅम्पियनसारखा खेळ करत मुंबईने दुसऱ्या आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी मुंबईने २०१३ साली स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि लेंडल सिमन्स यांच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २०२ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला —- धावा करता आल्या आणि मुंबईने — धावांनी विजय मिळवत जेतेपदावर आपले नाव कोरले.
मुंबईच्या २०३ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीला २२ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर चेन्नईच्या धावसंख्येला खिळ बसली. ड्वेन स्मिथ आणि सुरेश रैना यांना मोठे फटके मारता येत नसल्याने चेन्नईला योग्य धावांची गती राखता आली नाही. पण स्थिरस्थावर झाल्यावर स्मिथने ४८ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि एक षटकार लगावत ५७ धावा केल्या. हरभजन सिंगने पायचीत पकडत स्मिथचा काटा काढला. त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात रैनाही (२८) हरभजनच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला आणि चेन्नईच्या हातून सामना निसटला.
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि मुंबईने २०२ धावांचा डोंगर उभारला. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांनी सलामीवीर पार्थिव पटेलला (०) झटपट गमावले. पण पहिल्या धक्क्याचे कोणतेही दडपण न घेता रोहित आणि सिमन्स यांनी मुक्तपणे फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या आवडत्या ईडन गार्डन्सवर रोहितने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात पाच चौकारांची लूट केली. रोहित एका बाजूने जोरदार फटके लगावत असताना सिमन्सनेही दुसऱ्या बाजूने चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायला सुरुवात केली. रवींद्र जडेजाच्या सहाव्या षटकामध्ये सिमन्सने दोन चौकार आणि एका षटकारासह १४ धावा फटकावल्या. या दोघांनी चेन्नईचा मारा निष्प्रभ करत दहाच्या सरासरीने धावा जमवत १२ षटकांमध्ये १२० धावा फटकावल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६७ चेंडूंमध्ये ११९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या भागीदरीमध्ये सिमन्स नशिबवान ठरला. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मोहित शर्माच्या गोलंदाजीवर पवन नेगीने सिमन्सचा अवघड झेल टीपण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि या चेंडूवर दोन धावा घेत सिमन्सने स्पर्धेतील सहावे अर्धशतक झळकावले. सिमन्सने ४५ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६८ धावा फटकावल्या. यावेळी सिमन्सपेक्षा रोहित अधिक आक्रमक खेळला. रोहितने २६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी साकारली.
लागोपाठच्या दोन चेंडूंवर हे दोघेही बाद झाले तेव्हा १२.१ षटकांमध्ये मुंबईची ३ बाद १२० अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर किरॉन पोलार्ड आणि अंबाती रायुडू यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. पोलार्डने १८ चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकार लगावत ३६ धावा फटकावल्या, तर रायुडूने २४ चेंडूंमध्ये ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ३६ धावांची खेळी साकारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा