CSK vs MI Vighnesh Puthur MS Dhoni Video: इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ४ गडी राखून पराभव केला. यासह चेन्नईने १८व्या मोसमाची विजयाने सुरुवात केली. दुसरीकडे, मुंबईने सलग १३व्या वर्षी आयपीएलचा सलामीचा सामना गमावला आहे. या सामन्यात भलेही विजय चेन्नई सुपर किंग्स संघाने मिळवला, मात्र चर्चेत मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूर आहे. चेन्नईच्या विजयानंतर धोनीने जाऊन त्याची भेट घेतली.
विघ्नेश पुथूरने चेपॉकमधून चेन्नईविरूद्ध सामन्यात आयपीएल पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला आणि त्याच्या गोलंदाजीने सर्वांनाच चकित केलं. पुथूरने चेन्नईच्या मधल्या फळीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. सहज विजय मिळवू पाहणाऱ्या चेन्नईला विघ्नेशमुळे अटीतटीच्या लढतीला सामोर जावं लागलं.
केरळच्या विघ्नेश पुथूरने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट मिळवले. एमए चिदंबरम स्टेडियमच्या फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीवर पुथूरने प्रथम चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला झेलबाद केले. ऋतुराजने आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईवर चांगलाच दबाव आणला होता. ऋतुराजने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. यानंतर विघ्नेश पुथूरने शिवम दुबे आणि दीपक हुडा यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुबेने ९ तर हुडाने ३ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर धोनीने संघाशी हस्तांदोलन करताना विघ्नेश पुथूरची भेट घेतली. यादरम्यान धोनी विघ्नेश पुथूरबरोबर गप्पा मारताना दिसला. धोनीने विघ्नेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं कौतुक केलं. दरम्यान विघ्नेश धोनीच्या कानात काहीतरी बोलताना देखील दिसला. तर यादरम्यान सुरेश रैना, अंबाती रायडू यांनी कॉमेंट्री करताना धोनी त्याच्याशी बोलताना नेमकं काय बोलला ते सांगितलं. रैना म्हणाला, ‘धोनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलं की, तू किती वर्षांचा आहेस?’ व्हीडिओमध्ये धोनी नेमकं विघ्नेशशी काय बोलत आहे हे कळलं नाही पण त्याला शाबासकी मात्र दिली.
धोनी आणि विघ्नेश पुथूर यांचा बोलतानाचा फोटो आणि व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील विघ्नेश पुथूरच्या कामगिरीचं कौतुक केलं. मुंबई इंडियन्सच्या स्काऊट टीमने विघ्नेशसारख्या उत्कृष्ट गोलंदाजाला शोधून काढलं आणि आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याला पदार्पणाची संधी दिली अन् विघ्नेशने या संधीचं सोन करत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर यश मिळवलं.