Vignesh Puthur in CSK vs MI Match IPL 2025: मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील एल क्लासिको सामन्यावर सर्वांच्या नजरा होत्या. पण या सामन्यात मुंबई इंडियन्सचा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूरने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल २०२५ च्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एक नवा इम्पॅक्ट खेळाडू उतरवत सर्वांना चकित केलं. केरळचा युवा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने सुपरस्टार रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट सब म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले. फक्त पदार्पणचं नाही केले तर या पदार्पणात त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर ३ षटकांत ३ विकेट घेत चमकदार कामगिरी केली. पण हा युवा खेळाडू नेमका आहे कोण, जाणून घेऊया.
१५५ धावांचा बचाव करत असताना आठव्या षटकात कर्णधार सूर्यकुमारने पुथूरला गोलंदाजी सोपवली. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने मैदानात सेट झालेल्या सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गायकवाड ५३ धावांवर लाँग ऑफला झेलबाद झाला. त्याच्या दुसऱ्या षटकात पुथूरने विस्फोटक फलंदाज शिवम दुबेला गुगली टाकली आणि मोठा फटका खेळू पाहत असलेला दुबे झेलबाद झाला. यानंतर दीपक हुडादेखील त्याच्या गोलंदाजीवर सारख्याच पद्धतीने सीमारेषेजवळ झेलबाद झाला. विघ्नेश पुथूरच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा संघ कडवी झुंज देण्यात यशस्वी ठरला.
केरळमधील मलप्पुरमचा रहिवासी असलेल्या २३ वर्षीय पुथुरचे आयपीएलमधील पदार्पण विशेष आहे. विशेषतः या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने त्याच्या राज्याकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये वरिष्ठ स्तरावर अद्याप पदार्पण केलेलं नाही. विघ्नेश पुथूरचे बाबा एक रिक्षाचालक आहेत. पण आज विघ्नेशच्या आयपीएलमधील पदार्पणाच्या कामगिरीनंतर त्याने झटक्यात प्रसिद्धी मिळवली आहे.
? ????? ????? ✨
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
Twin strikes from the young Vignesh Puthur sparks a comeback for #MI ?
Updates ▶️ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/DKh2r1mmOx
एका रिक्षा चालकाचा मुलगा असलेला विघ्नेश पुथूर केरळकडून फक्त १४ आणि १९ वर्षांखालील संघात खेळला आहे. गेल्या वर्षी केरळ क्रिकेट लीगमध्ये जेव्हा तो अॅलेप्पी रिपल्ससाठी खेळला तेव्हा त्याने सर्वांचं लक्ष वेधलं. या लीगमध्ये खेळताना एमआयच्या स्काउट्सने त्याची दखल घेतली होती, जिथे त्याने तीन सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट घेतल्या होत्या. पुथूर तामिळनाडू प्रीमियर लीगमध्येही चांगला खेळला होता.
© IE Online Media Services (P) Ltd