PBKS beat CSK by 7 wickets : आयपीएल २०२४ मधील ४९वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज संघात खेळला गेला. चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाने ३ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.

पंजाबचा चेन्नईवर सलग पाचवा विजय –

चेपॉकमध्ये पुन्हा एकदा पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. यावेळी पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला. फिरकीपटूंना अनुकूल अशा खेळपट्टीवर प्रथम खेळून चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने १७.५व्या षटकातच ३ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने ३० चेंडूत ४६ आणि रिली रॉसोने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. तसेच शशांक सिंग २५ धावांवर नाबाद तर सॅम करन २६ धावांवर नाबाद परतला. पंजाबचा या मोसमातील हा चौथा विजय आहे. त्याचबरोबर चेन्नईविरुद्धचा हा सलग पाचवा विजय आहे. सीएसकेसाठी शार्दुल ठाकुर, शिवम दुबे आणि पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक ठरले व्यर्थ –

प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हरप्रीत ब्रारने अजिंक्य रहाणेला बाद करुन मोडली. रहाणे २९ धावांवर बाद झाला. यानंतर ब्रारने त्याच षटकात शिवम दुबेला बाद केले, खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर राहुल चहरने जडेजाला बाद केल्याने चेन्नईचा डाव गडगडला. चेन्नईला चांगली सुरुवात पुढे नेता आली नाही आणि अवघ्या सहा धावांत तीन गडी गमावले. चेन्नईसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४८ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकिस्तानने जाहीर केले ठिकाण, भारतीय संघाचे सगळे सामने ‘या’ शहरात होणार

चेन्नईच्या सातत्याने विकेट्स पडत असताना कर्णधार ऋतुराजने पुन्हा एकदा संयमी खेळी खेळली आणि अर्धशतक झळकावले. ऋतुराजच्या खेळीच्या जोरावरच संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. त्याला समीर रिझवी आणि मोईन अली यांनी साथ दिली, पण पंजाबच्या गोलंदाजांसमोर चेन्नईची फलंदाजी फारशी धावा करू शकली नाही. शेवटी महेंद्रसिंग धोनीने काही फटके मारले, पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना तो धावबाद झाला. या हंगामात धोनी बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. धोनीने ११ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे सीएसकेने ७ बाद १६२ धावा केल्या. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.