MS Dhoni Trolled for Batting At no. 9 IPL 2025: आयपीएल २०२५ मधील सामन्यात सीएसकेला आरसीबीकडून त्यांच्या घरच्या मैदानावर ५० धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात सीएसकेची संपूर्ण फलंदाजी फळी फेल ठरली. आरसीबीच्या गोलंदाजांनी सीएसकेच्या धावांना असा ब्रेक लावला की संघ यातून सावरू शकला नाही आणि आरसीबीने दणदणीत विजय मिळवला. धोनीसारखा उत्तम फिनिशर सीएसकेच्या संघात असून तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तोपर्यंत सामना सीएसकेच्या हातून निसटला होता. आता धोनी आणि सीएसकेला चाहते ट्रोल करत आहेत.

चेन्नईने या सामन्यात ८० धावांवर सहा विकेट गमावल्या असताना महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला येईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण त्याने अश्विनला फलंदाजी पाठवलं आणि सामना पूर्णपणे हाताबाहेर गेल्यावर धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. धोनीच्या या निर्णयामुळे इरफान पठाणही संतापला आणि चाहत्यांनी धोनी व सीएसकेसा खडे बोल सुनावले आहेत.

आरसीबीने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने ९९ धावांमध्ये १६व्या षटकात सहावी विकेट गमावली. यानंतर सामना पूर्णपणे हाताबाहेर गेल्यावर धोनी फलंदाजीला आला. पराभूत झालेल्या सामन्यातील शेवटच्या षटकात त्याने दोन षटकार मारले. मात्र विजय मिळवणं संघाच्या आवाक्याबाहेर गेलं होतं. यानंतर धोनी ९व्या क्रमांकावर आल्यानंतर इरफान पठाणने त्याच्या एक्स हँडलवर लिहिले की, ‘मी कधीच धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजी करेल या निर्णयाच्या बाजूने नाही. हे त्याच्या संघासाठी चांगले नाही.’

यानंतर चाहत्यांनीही धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याबद्दल निराशा व्यक्त केली. एका चाहत्याने म्हटले, ‘सेल्फीश… शिवम दुबे बाद झाल्यानंतर संघाला त्याची गरज असताना एमएस धोनीने न येता खालच्या क्रमांकावर फलंदाजी करून गमावलेल्या सामन्यात षटकार मारून काय उपयोग?’ तर इतर चाहत्यांनीही धोनीला खडे बोल सुनावले आहेत, अखेरच्या षटकात येऊन षटकार मारण्याचा काय उपयोग ते वायाच गेले. यापेक्षा निवृत्ती घ्यावी असंही म्हणाले.

फक्त चाहतेच नाही तर धोनीचे माजी सहकारी खेळाडू देखील संघाच्या या निर्णयावर टीका करताना दिसले. सीएसके आणि धोनीच्या या निर्णयांनी अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांसारखे त्यांचे जुने समालोचक सहकारीही निराश झाले. संघाच्या विजयासाठी धोनीने लवकर फलंदाजीला यायला हवे होते, असे म्हटले. या दोघांच्या मते धोनीने ५ विकेट पडल्यानंतर यायला हवे होते, कारण त्यावेळीही सीएसकेला सामन्यात टिकून राहण्याची थोडी संधी होती पण ९व्या क्रमांकावर येणे संघाची खराब विचारसरणी दर्शवते. याशिवाय रवी शास्त्री म्हटले नवव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचं आहे तर त्यापेक्षा आयपीएलचं खेळू नका. धोनीने लवकर फलंदाजीला यायला हवं होतं.