Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings IPL Match Updates: आयपीएलच्या २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होत आहे. दोन्ही संघ सोमवारी (१७ एप्रिल) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. चेन्नईचा या मोसमातील हा पाचवा सामना आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्याचवेळी आरसीबीने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईने धुव्वाधार फलंदाजी करत कॉनवे-शिवमच्या अर्धशतकांमुळे चेन्नईने बंगळुरूसमोर २२७ धावांचे आव्हान ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असणारा ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाला. मोहम्मद सिराजने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिला, त्याने सहा चेंडूत अवघ्या तीन धावा केल्या. चेन्नईने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक पूर्ण करून दिले. पॉवर-प्लेमध्ये त्या दोघांनी मिळून ५३ धावा केल्या केल्या.

हसरंगाने आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे २० चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. रहाणेने डेव्हॉन कॉनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने त्याच षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. कॉनवेने शिवम दुबेला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. १६व्या षटकात चौथ्या चेंडूवर हर्षल पटेलने डेव्हॉन कॉनवेला क्लीन बोल्ड केले. कॉनवे ४५ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. कॉनवेने शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

हेही वाचा: CSK vs RCB Score: ‘तो आला, त्याने पाहिले अन् थेट स्टेडियमच्या बाहेर…’; अजिंक्य रहाणेचा अप्रतिम गगनचुंबी षटकार, पाहा Video

चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन षटकांत दोन धक्के बसले. वेन पारनेलने १७व्या षटकात शिवम दुबेला बाद केले. शिवम दुबे २७ चेंडूत ५२ धावा करून सिराजकडे झेलबाद झाला. दुबेने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. त्याच्यानंतर विजयकुमारने १८व्या षटकात अंबाती रायडूला बाद केले. रायुडू सहा चेंडूत १४ धावा करून दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला. त्याचवेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका चेंडूवर एक धाव घेत नाबाद राहिला. आरसीबीच्या मोहम्मद सिराज, वेन पारनेल, विजयकुमार वायसाक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले. चेन्नईने आपल्या डावात १७ षटकार ठोकले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs rcb score shivam conways brilliant half century chennai super kings challenge for 227 runs against bangalore avw
Show comments