Virender Sehwag and Manoj Tiwary raised questions on Rajasthan Royals batting : आयपीएल २०२४ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईने ५ विकेट्सनी विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर फिक्सिंगबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. हा सामना फिक्स असल्याचा दावा सोशल मीडियावर सातत्याने केला जात आहे. आता भारताचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारी यांनी या सामन्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, जे काही वेगळेच संकेत देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रविवारी चेपॉकवर पार पडला. या सामन्यानंतर भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि मनोज तिवारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजीबरोबर संजू सॅमसनच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. चेन्नईविरुद्ध राजस्थानचा संथ खेळ लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकात ५ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रियान परागने ३५ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४७ धावांची सर्वात मोठी खेळी साकारली. याशिवाय इतर सर्व फलंदाज संथ आणि छोटी खेळी खेळून बाद झाले. उर्वरित फलंदाजांची संथ खेळी आता संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. सलामीवीर यशस्वी जैस्वालने २१ चेंडूत २४ धावा आणि जोस बटलरने २५ चेंडूत २१ धावा करुन बाद झाले. त्यानंतर संजू सॅमसनने १९ चेंडूत १५ धावा केल्या.

हेही वाचा – IPL 2024 : सलग तिसऱ्या पराभवानंतर संजू सॅमसन नाराज; म्हणाला, ‘माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की जर…’

परंतु प्रयत्न तरी दिसायला हवे होते –

या सामन्यानंतर सेहवाग आणि मनोज तिवारी यांनी क्रिकबझवर राजस्थानच्या संथ खेळीबद्दल चर्चा केली. यामध्ये पहिल्यांदा मनोज तिवारी म्हणाला, “राजस्थान रॉयल्सची फलंदाजी स्पर्धेच्या पूर्वार्धापर्यंत फरारीसारखी धावत होती. मला कळत नाही की अचानक काय झाले? कदाचित खूप उष्णता असेल. परंतु प्रयत्न तरी दिसायला हवे होते. कमी धावा केल्या, हे समजण्यासारखे आहे. पण तुमच्या हातात ७ विकेट्स असताना तुम्ही प्रयत्न तरी करायला हवा होता. १९व्या षटकात तुमच्या तीन विकेट पडल्या होत्या.”

जणू तो एकदिवसीय क्रिकेट खेळत होता –

यानंतर वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “संजू सॅमसन फलंदाजीला आला, तेव्हा तो एवढ्या आरामात खेळत होता, जणू तो एकदिवसीय क्रिकेट खेळत होता. ती अशी खेळपट्टी नव्हती, जिथे चेंडू जास्त फिरत होता. तरी सुद्धा संजूने जडेजाच्या ४ षटके आरामात खेळून काढली. त्यामुळे मला ते समजले नाही.” पहिल्या ९ पैकी ८ सामने जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सला सलग तीन सामने गमवावे लागले आहेत. ज्यामुळे ते आतापर्यंत प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू शकले नाहीत. याआधी राजस्थान पात्र ठरणारा पहिला संघ असेल असे बोलले जात होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs rr match fixing virender sehwag and manoj tiwary raised questions on rajasthan royals batting vbm