Rajasthan Royals vs Chennai Super Kings Todays IPL Match Updates: आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी (१२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. राजस्थानच्या रजवाड्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर ३ धावांनी रोमांचक विजय संपादन केला. शेवटच्या षटकात संदीप शर्माने अप्रतिम शेवटचे दोन यॉर्कर चेंडू टाकत संघाला विजय मिळवून दिला. राजस्थानच्या चांगल्या सुरुवातीनंतरही अनुभवी रवींद्र जडेजा याने किफायतशीर गोलंदाजी करत राजस्थानला रोखण्याचे काम केले. यासोबतच त्याने आपल्या टी२० कारकिर्दीतील एक खास टप्पा देखील पार केला पण फलंदाजीतील त्यांचे प्रयत्न कमी पडले. आर. अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
शेवटच्या चार षटकात चेन्नईचे खंदे शिलेदार धोनी आणि जडेजाने विजयानजिक नेण्याचा प्रयत्न केला पण विजयी सीमारेषा पार करण्यात अपयशी ठरला. अवघ्या तीन धावांनी चेन्नईचा पराभव झाला. धोनीच्या पराक्रमानंतरही सीएसकेचा राजस्थानविरुद्धचा सामना तीन धावांनी हरला. संदीप शर्माने शेवटच्या तीन चेंडूत ७ धावांचा बचाव करत अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. धोनीने २ षटकार मारून सामना विजयाच्या जवळ आणला होता. मात्र संदीप शर्माने अनुभवाच्या जोरावर धोनीच्या संघाचा पराभव केला. राजस्थानने चेन्नईसमोर विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धोनीच्या संघाला केवळ १७२ धावाच करता आल्या.
राजस्थानने ठेवलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाडला ( ८) आज अपेक्षित सुरुवात करता आली नाही. संदीप शर्माने दुसऱ्या षटकात त्याला झेलबाद केले. डेव्हिड कॉनवेला जीवदान मिळाल. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने डीप स्क्वेअर लेगला हा झेल टाकला. या दोघांनी आतापर्यंत ४० चेंडूंत ६३ धावांची भागीदारी केली. अजिंक्यचे लक्ष विचलीत करण्यासाठी अश्विनने डाव खेळला. अजिंक्य पुढे येऊन फटका मारण्यासाठी येताच अश्विनने गोलंदाजी करणे टाळले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर अश्विन गोलंदाजीसाठी क्रिजपर्यंत आल्यावर अजिंक्य बाजूला सरकला. अजिंक्यच्या या प्रतिक्रियेने स्टेडियमवर प्रेक्षक खूश झाले. त्यानंतर काही चेंडूनंतर अजिंक्यने खणखणीत षटकार मारला.
डेव्हॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रहाणे १९ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. शिवमने ८ धावा केल्या. यानंतर मोईन अली, अंबाती आणि डेव्हॉन कॉनवे सात चेंडूंच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले. कॉनवे अर्धशतक झळकावून बाद झाला. शेवटच्या षटकात जडेजा आणि धोनीने मोठे फटके मारत संघाला विजयाच्या जवळ आणले, मात्र ते अपयशी ठरले. राजस्थानकडून अश्विन आणि चहलने प्रत्येकी विकेट्स घेत मधल्या षटकात चेन्नईच्या डावाला लगाम घातला त्यांना झॅम्पा आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट घेत मोलाची मदत केली.
हेही वाचा: IPL 2023: अरे खेळाडू नाही तर पंच म्हणून तरी घ्या! सचिनच्या लेकाचा भन्नाट Video व्हायरल
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अपयशी ठरला, पण देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अष्टपैलू आर अश्विननेही चांगली फटकेबाजी केली. पडिक्कल व अश्विन या दोघांना फिरकीपटू मोईन अलीने स्लीपमध्ये झेल सोडून जीवदान दिले आणि तिथेच चेन्नईने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. पडिक्कल व बटलर यांनी ४१ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली. पडिक्कल २६ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावांवर झेलबाद झाला. अश्विनने २२ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३० धावांवर बाद झाला. बटलरने ३७ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा केल्या. शेवटच्या षटकांत शिमरॉन हेटमायरने १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकार लगावत नाबाद ३० धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १७५ धावा केल्या. रवींद्र जडेजा, आकाश सिंग व तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. राजस्थानने तब्बल आठ वर्षांनी चेन्नईला त्यांच्या घरात पराभूत केले.