चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड त्याच्या आयपीएल कारकिर्दीतीलील दुसरे शतक झळकावण्यापासून हुकला आहे. आयपीएल २०२२ च्या ४६व्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने आणखी एक धाव घेतली असती तर आयपीएलच्या या मोसमात शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला असता. ऋतुराज गायकवाडने हैदराबादविरुद्ध चांगली खेळी खेळली, मात्र तो ९९ धावा करून बाद झाला.
नाणेफेक हरल्यानंतर सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल केला. गायकवाडने उमरान मलिक, टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांचा खरपूस समाचार घेतला. ऋतुराजने, ५७ चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ९९ धावा केल्या. नंतर ऋतुराज टी नटराजनच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारकडे झेलबाद झाला. पण त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणले होते.
ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये एक शतक झळकावले असून त्याचे दुसरे शतक हुकले. आयपीएल २०२१ चा ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाडला हा हंगाम चांगला गेला नाही. परंतु त्याने काही सामन्यांमध्ये चांगल्या खेळी करून आपला आत्मविश्वास वाढवला आहे. गेल्या काही सामन्यांत तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गायकवाडने आतापर्यंत नऊ सामन्यांत दोन अर्धशतकांसह २३७ धावा केल्या आहेत.
यासह ऋतुराज गायकवाडने आयपीएलमधील एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो सर्वात कमी ३१ डावात इथपर्यंत पोहोचला आहे. ऋतुराजने माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचीही बरोबरी केली आहे. त्याने ही कामगिरी ३१ डावात केली होती. दरम्यान, कॉनवेने ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या चालू मोसमातील हे त्याचे पहिले अर्धशतक आहे. त्याचवेळी ऋतुराजने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
दरम्यान, एमएस धोनी या सामन्यात तिसऱ्या क्रमांकांवर फलंदाजीसाठी आला होता. सात चेंडूत आठ धावा करून तो नटराजनचा दुसरा बळी ठरला. कॉनवे ५५ चेंडूत ८५ धावा करून नाबाद राहिला. आठ चौकार आणि चार षटकार मारले. रवींद्र जडेजाही एक धाव काढून नाबाद परतला. हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने चालू मोसमात आपल्या वेगवान कामगिरीने अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र या सामन्यात तो अपयशी ठरला. त्याने चार षटकात ४८ धावा दिल्या आणि त्याला विकेटही घेता आली नाही.