आजपासून आयपीएल धमाका सुरू होतोय. बाळाच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त बाबा राजीव शुक्ला खूश आहेत. राजीव शुक्ला आयपीएलच्या मधल्या सुटीत एक मंत्रिपदसुद्धा सांभाळतात. पार्लमेंटरी अफेअर्स. लफडी निस्तरण्यात त्यांचा डावा हात कोणी धरू शकत नाही. (ते डावखुरे आहेत असे ऐकून आहे) तर आपल्या आयपीएल नावाच्या बाळाने कसे गुटगुटीत बाळसे धरले आहे आणि त्याची कीर्ती कशी वसुंधरेच्या कानाकोप-यात पसरली आहे, याची प्रचिती घेण्यासाठी शुक्लासाहेबांनी आम्हाला मोहिमेवर पाठवले. ‘जा, सगळय़ा जगात कसा आयपीएल ज्वर संचारला आहे ते बघा आणि मला खबर द्या, असे फर्मान त्यांनी आम्हाला सोडले. खरे म्हणजे हे काम ते रवि शास्त्रीला सांगणार होते.
रवि शास्त्री हे बीसीसीआयचे सुधीर गाडगीळ आहेत. (शास्त्रींना मुलाखतीतील ‘भारतभूषण पुरस्कार’ जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. या ‘भारतभूषण’चा सिनेमाशी बेल्सच्या काडीचाही संबंध नाही) तर शुक्लाजींच्या फर्मानाप्रमाणे आयपीएल ज्वर तपासण्याकरिता आम्ही एक सर्वदूर दौरा काढला. या दौ-यातील घेतलेली विविध जाती, धर्म, वय, व्यवसाय अशा सर्व थरांतील मतांचा हा डेटाबेस.
१) कुमार संदेश श्रीधरन- इयत्ता ७ वी.
‘३ एप्रिल ते २६ मे म्हणजे नुसता कल्ला. टीव्ही, मित्र, पॉपकॉर्न, वेफर्स, पेप्सी बाबांना सांगितलंय ओव्हर टाइम करा.’
२) रमेश सदारंगानी- प्रोप्रा. मनीमाइंड शेअर्स-
‘चाळीस ओव्हर्स टाकून जडेजाला दहा कोटी मिलनार? वडी साई. पोराची शाला बिला बंद. कॉलनीत क्रिकेट कोच कोन हाय का रे?’
३) मलकार्जुन अप्पा गलगले- मु. पो. उस्मानाबाद.
‘आयपीएल म्हणजे‘इकडंबी पान्याची लाइन असंच ना?’
४) गुंडान्ना शेट्टी- मालक ऐश्वर्या रेस्टॉरंट अँड बार
‘मागच्या टाइमला लय त्रास झाला. या टाइमला बीअरच्या फॅक्टरी आऊटलेटला डायरेक्ट हॉटेलचा पाइप जोडलाय. रात्री तीनपर्यंत लोक ऐकत नाहीत. गल्ल्यावर मी, बायको, दोन मुलं, तीन मुली बसवून पण भागत नाही. आयपीएल म्हणजे एक नंबर लक्ष्मी.’
५) डेनीस रिचर्डसन- मु. पो. यॉर्कशायर, इंग्लड
‘आयपीएल म्हणजे काय क्रिकेट आहे? एक पाय पुढे टाकायचा आणि बॅट फिरवायची. आमच्याकडे यॉर्कशायरला सीझनच्या पहिल्या सहा महिन्यांत कुणी हूक किंवा पुल मारला तर त्याला हाकलून देतात. Tradition नावाची चीज आहे का नाही?’
६) परमिंदर सिंग- मु. पो. लुधियाना, पंजाब
‘सिक्सर तो कोई भी उठा सकता है मगर टीना अंबानी को सिर्फ भज्जी उठा सकता है।’
७) अध्यात्म महिला भजनी मंडळ, पुणे (सर्वाचं एकमत)
‘पिक्चरपेक्षा शाहरूख मैदानावर काय हॅन्डसम दिसतो.’
काही मुलाखती आम्हाला घेता आल्या नाहीत, पण आमचा फेस रीडिंगचा अभ्यास दांडगा असल्याने लोकांच्या मनात उठलेले तरंग आम्ही तात्काळ पकडतो.
१) विराट कोहली – ‘चेन्नईला आपण मॅचला जाणार नाही. च्यायला, तिथल्या चीअर लीडर्स भरतनाटय़म् करतात.’
२) विजय मल्ल्या – ‘या वेळेस हरलो तर कॅलेंडरवरच्या मुलींइतके पण कपडे लोक मला घालू देणार नाहीत. खेळाडूंच्या बसचे ड्रायव्हर म्हणून आपल्या पायलट्सना आणि ड्रिंक्स न्यायला आपल्या हवाईसुंदरींना ऑफर देता येईल.’
३) जेसी रायडर – ‘आयपीएलमध्ये पाटर्य़ा नाहीत म्हणून आधीच भरपूर पिऊन घेतली. कसं फसवलं!’
४) मायकेल क्लार्क – ‘पाठदुखीमुळे खेळता येत नाही आणि खुर्चीवर बसून मिकी आर्थरला निबंध लिहून दाखवता येत नाही. आता ह्याचा राग कुणावर काढायचा?’
५) सुब्रतो रॉय- मेरे जेब में सेबी है। हमारा युवराज धोबी है। सबको धो डालेगा।
सगळा डेटा घेऊन आम्ही शुक्लाजींकडे गेलो. शुक्लाजी ३० मे नंतर भेटतील असे कळले. आम्ही शुक्लाजींना डेटा मेल केला. शुक्लाजींचा मेल आला.
‘यह है आयपीएल का फीवर’
आजच्या संध्याकाळी अम्पायर म्हणतील,
‘जेंटलमन, प्ले’आणि..
sachoten@hotmail.com