David Warner Press Conference : सनरायझर्स हैद्राबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि हेन्री क्लासेनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळं एसआरएच दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करण्यात यशस्वी झाली. या पराभवामुळं दिल्ली कॅपिटल्सचा टॉप ४ मध्ये जागा बनवणं कठीण झालं आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात अक्षर पटेल पुन्हा एकदा उशिरा फलंदाजी करण्यासाठी आला. दिल्लीच्या रणनितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अशातच सामना संपल्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वार्नरने याबाबत प्रतिक्रिया दिली. वार्नर म्हणाला, आमच्या प्लेईंगमध्ये मी आणि अक्षर पटेल दोघेही डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही अक्षरला फलंदाजीच्या क्रमवारीत खालच्या स्थानावर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
वार्नर माध्यमांशी बोलताना पुढं म्हणाला, “अक्षर पटेल चांगल्या लयमध्ये आणि फॉर्ममध्ये आहे. पण, आमच्यासाठी डावखुरा फलंदाज वरच्या क्रमाकांवर आणि दुसरा फलंदाज ७ नंबरवर राहणं आवश्यक आहे. आम्हाला माहित होतं की, त्यांच्या फिरकीपटूंना डावखुरा फलंदाज चांगलं खेळू शकतो. परंतु, आमच्याकडे फक्त अक्षरच होता. आमच्याकडे दोन खेळाडू होते, जे मोठी खेळी करू शकले असते आणि शेवटच्या षटकांमध्ये अक्षरच काहीतरी करू शकतो. परंतु, आम्ही त्या वरच्या स्थानावर पाठवण्याबाबत विचार करू शकलो असतो.”
अक्षर पटेलने या सामन्यात १४ चेंडूत २९ धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने २ षटकार आणि १ चौकार मारला. पण संघाला विजय मिळवून देण्यात अक्षरला अपयश आलं. हैद्राबादचा सलामीचा फलंदाज अभिषेक शर्माने ३६ चेंडूत ६७ धावा आणि क्लासेनने २७ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. या धावांच्या जोरावर हैद्राबादने २० षटकांत १९७ धावांपर्यंत मजल मारली होती.