CSK vs DC IPL 2025 Match Highlights: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सचा २५ धावांनी मोठा पराभव केला आहे. यासह दिल्ली कॅपिटल्सने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने या विजयासह १५ वर्षांनंतर चेपॉकच्या मैदानावर विजयाची नोंद केली. दिल्लीने दिलेल्या १८४ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २० षटकांत ५ विकेट्स गमावत १५८ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सने अष्टपैलू कामगिरी करत चेन्नईला पराभवाचा दणका दिला. यासह दिल्लीने यंदाच्या मोसमात विजयाची हॅट्ट्रिक नोंदवून गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचवेळी चेन्नईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. धोनीसाठी हा सामना देखील खास होता कारण पहिल्यांदाच धोनीचे आई-वडील त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते, पण त्यांच्यासमोर धोनीला संघासाठी विजयी कामगिरी करता आली नाही.

चेपॉकवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८३ धावा केल्या. दिल्लीसाठी, त्यांचा नवा स्टार खेळाडू केएल राहुलला यावेळी सलामीला उतरावे लागले, कारण सलामीवीर फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे सामना खेळणार नव्हता. राहुलने या संधीचा फायदा घेत कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट अर्धशतक झळकावले.

चेपॉकवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८३ धावा केल्या. दिल्लीसाठी, त्यांचा नवा स्टार खेळाडू केएल राहुलला यावेळी सलामीला उतरावे लागले, कारण सलामीवीर फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे सामना खेळणार नव्हता. राहुलने या संधीचा फायदा घेत कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. राहुलने ५१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्याशिवाय अभिषेक पोरेलने झटपट ३३ धावा केल्या, तर ट्रिस्टन स्टब्स, कर्णधार अक्षर पटेल आणि समीर रिझवी यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह संघाने १८३ धावांचा टप्पा गाठला.

अखेरच्या षटकांमध्ये मथीशा पथिरानाने दिल्लीच्या धावसंख्येवर अंकुश ठेवत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले, पण सीएसके संघाचे फलंदाज मात्र ही धावसंख्या गाठण्यातही अपयशी ठरले. खलील अहमदने २ विकेट्स तर जडेजा, नूर अहमद, मथीशा पथिराना यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

चेन्नईने २०१९ पासून, आयपीएलमध्ये १८० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले नाही. संघाचा हा ट्रेंड यावेळीही कायम राहिला. पॉवरप्लेमध्ये पुन्हा एकदा संघाची सुरुवात खराब झाली आणि नवीन सलामीची जोडीही काही चांगली कामगिरी करू शकली नाही. संघाने अवघ्या ६ षटकांत ३ गडी गमावले होते, तर ११ व्या षटकापर्यंत संघाने७४ धावांत ५ विकेट्स गमावले. चेन्नईचा प्रत्येक फलंदाज धावांसाठी झुंज देताना दिसला. धोनी आणि विजय शंकर दोघेही मैदानावर खेळताना मोठे फटके खेळण्यासाठी झगडताना दिसले.

तिसऱ्या षटकात क्रीजवर आलेला विजय शंकर पहिल्याच चेंडूपासून धावांसाठी झगडताना दिसला आणि त्याच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही त्याच्या बॅटमधून एकही मोठा शॉट पाहायला मिळाला नाही. दरम्यान त्याला तीन वेळा जीवदान मिळाले. त्यानंतर एमएस धोनी ११व्या षटकात मैदानात आला. पण धोनीही धावांसाठी झगडताना दिसला. मात्र हे दोन्ही फलंदाज संघाला आवश्यक ती गती देऊ शकले नाहीत. फिनिशर धोनीने २६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह ३० धावा केल्या.

दिल्लीने दुसऱ्या डावात उत्कृष्ट गोलंदाजी चेन्नईच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. दिल्लीकडून फिरकीपटू विपराज निगमने शानदार गोलंदाजी करत २७ धावा देत २ विकेट्स घेतले. तर कुलदीप, स्टार्क, मुकेश कुमारने १-१ विकेट घेतली.