DC vs LSG IPL 2025 Highlights in Marathi: आशुतोष शर्माच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर एका विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. आशुतोष शर्मा आणि विपराजच्या खेळीने लखनौच्या मोठ्या धावसंख्येला आव्हान देत उत्कृष्ट भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. दिल्ली कॅपिटल्सने सुरूवातीला ६ विकेट्स गमावले असतानाही लखनौवर एका विकेटने विजय मिळवला आहे.

डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विशाखापट्टणम इथे झालेल्या लढतीत दिल्लीने शरणागतीच पत्करली होती. मात्र आशुतोष शर्माच्या अविश्वसनीय खेळीच्या जोरावर दिल्लीने थरारक विजय साकारला. २१० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची अवस्था ६५/५ अशी होती. ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी पाया रचला. यानंतर आशुतोष शर्माने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६६ धावांची तडाखेबंद खेळी साकारली.

लखनौने मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या वेगवान अर्धशतकी खेळींच्या बळावर २०९ धावांचा डोंगर उभारला होता. मार्शने ३६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ३६ चेंडूत ७२ धावा चोपून काढल्या. पूरनने ३० चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ७५ धावा कुटल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूत ८७ धावांची भागीदारी रचली. ही भागादारी फुटल्यानंतर लखनौचा वेग मंदावला.

लखनौचा नवा कर्णधार ऋषभ पंत ६ चेंडूत भोपळाही न फोडता तंबूत परतला. डेव्हिड मिलरने २७ धावा केल्या आणि त्याच्या अखेरच्या दोन चेंडूंवरील षटकारामुळे लखनौनं दोनशेची वेस ओलांडली. दिल्लीकडून कुलदीप यादवने ४ षटकात अवघ्या २० धावा देत २ विकेट्स पटकावल्या. मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या.

प्रत्युतरादाखल खेळताना शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच स्पेलमध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल तंबूत परतले. समीर रिझवी सिद्धार्थची शिकार ठरला. अनुभवी फाफ डू प्लेसिसने २९ धावा केल्या. पण रवी बिश्नोईने त्याची खेळी संपुष्टात आणली. नवोदित दिग्वेश राठीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटलेला माघारी धाडलं.

निम्मा संघ तंबूत परतलेला असताना ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी ३५ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. स्टब्ज बाद झाल्यानंतर सामन्याचं पारडं लखनौच्या दिशेने झुकलं. पण आशुतोष शर्माने मैदानात उतरताक्षणीच चौकार, षटकारांची लयलूट सुरू केली. धावगतीचं आव्हान १२च्या पल्याड गेलेलं असताना आशुतोष-विपराज जोडीने २२ चेंडूत ५५ धावा कुटल्या.

मोक्याच्या क्षणी राठीने विपराजला बाद केलं. त्याने १५ चेंडूत ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि कुलदीप यादवही बाद झाले. पण आशुतोषने हार मानली नाही. कुलदीप बाद झाल्यावर आशुतोषने चौकार-षटकार लगावले. शेवटच्या षटकात दिल्लीला ६ चेंडूत ६ धावा हव्या होत्या. शाहबाझ अहमदचा पहिला चेंडू निर्धाव पडला. दुसऱ्या चेंडूवर मोहित शर्माने एक धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर आशुतोषने विजयी षटकार लगावत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभ पंतने सोडलेला एक झेल आणि स्टम्पिंग लखनौला चांगलंच महागात पडलं.