IPL 2025 DC vs SRH Highlights in Marathi: दिल्ली कॅपिटल्सने रोमहर्षक सामन्यात वादळी फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादवर ७ विकेट्सने मोठा शानदार विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाला सर्वबाद करत दिल्लीने २५ चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला. दिल्लीने सुरूवातीपासूनच सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला आणि अखेरीस विजय मिळवून गतवर्षीच्या सामन्यातील पराभवाचा व्याजासकट बदला घेतला. मिचेल स्टार्कचे पाच विकेट्स आणि नंतर प्रत्येक फलंदाजाने फलंदाजीत दिलेले योगदान यामुळे दिल्लीचा संघ हा सलग दुसरा विजय मिळवण्यात यशस्वी ठरली.

अभिषेक पोरेलने १६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी षटकार लगावत दिल्लीचा विजय निश्चित केला. यासह दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसरा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत आरसीबीनंतर दुसरे स्थान गाठले आहे. दिल्लीच्या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट फिल्डिंग करत एकापेक्षा एक अनोखे झेल टिपले आणि या क्षेत्ररक्षणाच्या आणि पहिल्या डावातील कामगिरीच्या जोरावर दिल्लीने विजयाचा पाया रचला.

गतवर्षीच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्लीविरूद्ध २६६ धावांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती आणि प्रत्युत्तरात दिल्ली संघाला १९९ धावांवर सर्वबाद केले होते. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ८९ धावांची तर अभिषेक शर्माने ४२ धावांची खेळी केली होती. पण दिल्लीने यंदा हैदराबादचा लाजिरवाणा पराभव करत बदला घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरूवात केली. जेक फ्रेझर मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. तर फाफ डू प्लेसिसने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा करत बाद झाला. याशिवाय जेक फ्रेझर मॅकगर्कने ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटाकारांसह ३८ धावांचे योगदान दिले. यानंतर आलेल्या केएल राहुलने शमीच्या षटकात वादळी फटकेबाजी करत ३०० च्या स्ट्राईक रेटने ५ चेंडूत १५ धावा करत बाद झाला.

राहुलच्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेलने संघाचा डाव सावरत विजय मिळवून देत नाबाद माघारी परतले. स्टब्सने १४ चेंडूत ३ चौकारांसह २१ धावा केल्या. तर अभिषेक पोरेल १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार लगावत ३४ धावा करत नाबाद परतला.

सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. हैदराबादची विस्फोटक सलामी खेळी या सामन्यात फेल ठरली. अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात विचित्र पद्धतीने झेलबाद झाला. तर पॉवरप्लेमध्येच स्टार्कने दोन षटकात हैदराबादला ३ झटके दिले. स्टार्कने ट्रॅव्हिस हेड, इशान किशन आणि नितीश रेड्डीच्या विकेट घेत हैदराबादला धक्का दिला. यानंतर अनिकेत वर्माने एकट्याने हैदराबादला १५० च्या वर पोहोचवले.

अनिकेते ४१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ७४ धावांची शानदार खेळी केली. तर क्लासेन ३२ धावा करत बाद झाला. याशिवाय कोणताच फलंदाज १० धावांचा आकडाही गाठू शकला नाही. दिल्लीकडून स्टार्कने ३.४ षटकांत ३५ धावा देत ५ विकेट्स घेतले. तर कुलदीपने ४ षटकांत २२ धावा देत ३ विकेट्स घेतले. याशिवाय मोहित शर्माच्या खात्यात महत्त्वाची क्लासेनची विकेट मिळाली. यासह हैदराबादचा संघ १६३ धावा करत सर्वबाद झाला.